मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढणार का? ओवेसी यांचा लोकसभेत सवाल

एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका केली. ओवेसी म्हटले की केंद्रातील सरकारला मुस्लिमांची बिलकूल चिंता नाही. त्यांची दखल सरकार बिलकूल घेत नाही. मुसलमानांवर बहिष्कार टाका असं सत्ताधाऱ्यांचे नेते खुलेआम म्हणत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हिरवा रंग या सरकारच्या नेत्यांना खुपतो, असा आरोप करत त्यांनी ‘मोदी सरकार तिरंग्यातून हिरवा रंग काढून टाकणार का?’, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की बिल्किस बानोच्या दोषींची सुटका करण्यात आली कारण ती मुस्लिम महिला आहे. ‘जर बिल्किस बानो मुस्लिम नसत्या तर त्यांना न्याय मिळाला असता. त्या 20 वर्षांपासून लढत आहे, पण त्यांचे नाव बिल्किस बानो आहे. तुम्ही तिला न्याय देऊ इच्छित नाही’, असे ओवेसी म्हणाले. चीनला हिंदुस्थानातील मोदी सरकार घाबरत आहे. पंतप्रधान मोदींनी चीनला घाबरू नये, त्यांनी थेट चीनचं नाव घेतलं पाहिजे, असंही ते म्हटले. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. कायदेमंत्री इथून बाहेर गेले आहेत. ते कोलेजिएमवर बोलतात. मोदी सरकारने दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याकडून काही धडा घेतला पाहिजे असं ते म्हणाले. इंदिरा गांधी यांनी न्यायव्यवस्थेला हात लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना जनतेने घरी बसवलं. आता नरेंद्र मोदी म्हणत आहेत की न्यायव्यवस्थेनं माझं ऐकलं पाहिजे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.