मोदींच्या पोस्टरला काळं फासणाऱ्या सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार ना? नेटकऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांना प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
satyajeet tambe narendra modi devendra fadnavis

राज्यात सध्या पदवीधर निवडणुकांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र अचानक यात ट्विस्ट आला कारण सुधीर तांबे यांनी माघार घेतला आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. तसेच त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेण्याची गरज नाही, भाजपच्या नेत्यांची भेट घेईन, असं विधान करत राजकीय संकेत दिले. भाजपनं देखील सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे गुरुवारपासून वृत्तवाहिन्यांमध्ये याचीच चर्चा आहे. असं असतानाच सत्यजित तांबे यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे.

सत्यजीत तांबे युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असताना इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं होतं. तेव्हा, सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळं फासलं होतं. सत्यजीत तांबेंचा हा फोटो एका नेटकऱ्यानं ट्वीटर अकाउंटवरून शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शनही लिहिली आहे. ज्यामधून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल करत निशाणा साधला आहे. ‘देवेंद्रजी सत्यजीत तांबेंना पाठिंबा देणार ना?,’ असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.

दरम्यान, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजीत तांबे म्हणाले की, ‘मी काँग्रेस पक्षाचाच आहे. तरुणांना संधी मिळावी म्हणून वडिलांनी अर्ज दाखल केला नाही. मला पक्षाचे अधिकृत पत्र ( ए-बी फॉर्म ) वेळेत मिळू शकले नाही. त्यामुळे मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.’

तसेच काँग्रेसचाच उमेदवार असल्यानं त्या नेत्यांना भेटण्याची गरज नसल्याचं त्यांनी सांगितलं. ‘मी राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटणार आहे. भाजपा, शिवसेना, मनसे, रासप आणि राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे’, असं सत्यजीत तांबेंनी सांगितलं.