
बाजरीचे खळे करत असताना मळणी मशिनच्या मागील बाजूला चाळणीतील काढ काढण्यासाठी गेलेल्या विवाहीत महिलेचा मळणी यंत्राच्या शॉप्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. राहुरी तालुक्यातील चिखलठाण येथे रविवारी दुपारी ही घटना घडली. काकडे या शेतकऱ्याचे बाजरी पिकाचे खळे सुरू होते. यावेळी मशिनमध्ये चाळणीतील काढ काढण्यासाठी विजया काकडे (वय 24)0 ही महिला मळणी मशिनजवळ गेली होती. त्यावेळी त्यांनी डोक्याला बांधलेले फडके मशिनच्या शॉप्टमध्ये अडकल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
जखमी झालेल्या विजया यांना नातेवाईकांनी लोणी येथील प्रवरा मेडीकल ट्रस्टच्या दवाखान्यात दाखल केले. उपचारादरम्यान रविवारी रात्री 10 वाजता त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी लोणी येथे शवविच्छेदनानंतर विजया यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. दुपारी चिखलठाण येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विजया काकडे यांना तीन वर्षाची व अकरा महिन्यांची अशा दोन मुली आहेत. या घटनेने चिखलठाण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



























































