
एका महिला प्रवाशाने विमान प्रवासादरम्यान विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, असे करण्याआधीच एका प्रवाशाने या महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने दिलेले उत्तर ऐकून महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अलोम एग्बेग्निनाऊ ह्यूस्टन (34) ही महिला प्रवासी टेक्सास येथून कोलंबस, ओहायोला जाणाऱ्या साउथ वेस्ट एअरलाइन्सच्या विमानात बसली होती. त्यावेळी प्रवासात असताना काही वेळानंतर अचानक ती तिच्या जागेवरून उठली आणि दारापाशी जाऊन तिने विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. त्यावेळी विमान 37,000 हजार फूट उंचीवरून उड्डाण करत होतं. इतकंच नाही तर ती दारावर डोकं आपटत होती. महिलेचे हे कृत्य बघून विमानातील प्रवासी घाबरले. आता विमान कोसळेल की काय, असे त्यांना वाटू लागले. काही प्रवाशांनी अलोमला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तिने एका प्रवाशाच्या मांडीला चावा घेतला, तेव्हा या महिलेला कसेबसे नियंत्रणात आणण्यात आले. एका प्रवाशाला या महिलेने उत्तर दिले की, विमानाचा दरवाजा उघडण्यास स्वत: येशूने सांगितले आहे. त्यावेळी मात्र या महिलेला प्रयत्नपूर्वक नियंत्रणात आणले आणि विमानाचे अर्कान्सासमधील बिल आणि हिलरी क्लिंटन राष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. यानंतर क्रू मेंबर्सनी महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेबाबत सोमवारी, पूर्व डिस्ट्रिक्ट ऑफ आर्कान्सासच्या जिल्हा न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या कागदपत्रात असे लिहिले होते की, ‘ही वेडी स्त्री विमान उड्डाणादरम्यान विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होती. असे करण्यापासून वारंवार परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तरीही हे येशूने करण्यास सांगितले आहे, असे ती सतत सांगत होती. या घटनेबाबत महिलेवर प्राणघातक हल्ला आणि क्रू मेंबर्ससोबत हाणामारी केल्याप्रकरणी तपास सुरू होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणाबाबत अलोम ह्युस्टनने सांगितले की, मी खूप दिवसांपासून विमान प्रवास केला नाही त्यामुळे खूप काळजीत होते. शनिवारी माझ्या पतीला न सांगता मेरीलँडमधील कौटुंबिक मित्राला भेटण्यासाठी कोणत्याही बॅगेशिवाय घर सोडले. सहसा मी असे अजिबात वागत नाही.