
नववर्षातील पहिला सण असलेल्या मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत वाणवसा साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शुक्रवारी दिवसभर बाजारात लहान- मोठे खण, बांगडय़ा, चुडा, बोरे, गाजर आदी वाणवशाचे साहित्य खरेदी करण्यासाठी महिलांची लगबग दिसून येत होती.
कोरोनानंतर प्रथमच निर्बंधमुक्तपणे मकरसंक्रांती सण साजरा होत आहे. यामुळे नागरिकंमध्ये उत्साह आहे. शनिवारी (दि. 14) भोगी, तर रविवारी (दि. 14) मकरसंक्रांती आहे. त्यामुळे भोगी साजरी करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. शनिवारी भोगी आली असल्याने बहुतांशी महिलांनी शुक्रवारीच वाणवसा साहित्य खरेदी करण्यावर भर दिला आहे.
पंढरपूर शहरातील भादुले चौक ते अर्बन बँक, बुरूड गल्ली, उपनगरीय भागातही वाणवसा साहित्य विक्रीकरिता उपलब्ध करण्यात आले आहे. यात लहान खण 30 ते 35 रुपयांना, तर मोठे खण 70 ते 100 रुपयांना विक्री होत आहेत. कुंभारांनी या वेळेस खणांच्या किमतींत वाढ केलेली आहे. गतवर्षी लहान खण 20 ते 25 रुपयांना मिळत होता. या वेळेस 30 ते 40 रुपये दर करण्यात आला आहे. मोठा खण 50 रुपयांना मिळत होता. तो आता 70 ते 100 रुपयांना मिळत आहे. त्याचबरोबर वाणवसाकरिता लागणारे ऊस, गाजर, बोरे, खारीक, खोबरे, हळकुंड आदी साहित्यही खरेदी केले जात आहे. त्याचबरोबर सफरचंद, केळी, बोरेदेखील खरेदी केली जात आहेत.
बोरांचे भाव गगनाला
मकरसंक्रांतीला वाणवसा घेण्यास विशेष महत्त्व असते. या वाणवशामध्ये बोरेदेखील असतात. म्हणूनच बोरांना चांगली मागणी आहे. देशी आंबट बोरे 100 रुपये किलो, चेकनेट बोरे 100 ते 120 रुपये किलो, ऍपल बोर 500 ते 600 रुपये किलो दराने विक्री होत आहे.


























































