
हिंदुस्थानी नेमबाजांची विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील शानदार कामगिरी मंगळवारीही सुरूच राहिली. गनीमत सेखो व अंगद वीर सिंग या जोडीने शूटिंग रेंजवर अचूक निशाणा साधत स्कीट मिश्र दुहेरीत हिंदुस्थानला सुवर्ण पदक जिंकून दिले. या स्पर्धेतील हिंदुस्थानचे हे सातवे सुवर्ण पदक ठरले हे विशेष.
गनीमत सेखो व अंगद सिंग या जोडीने पात्रता राऊंडमध्ये 141 गुणांची कमाई करीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर गनीमत सेखो व अंगद सिंग या हिंदुस्थानी खेळाडूंनी कझाकस्तानच्या ओल्गा पनरीना व अॅलेक्झॅण्डर येचसेन्को या जोडीला 33-29 अशा फरकाने हरवत सुवर्ण पदकावर मोहोर उमटवली.
थोडक्यासाठी हुकले कास्य पदक
परीनाझ धलीवाल व मायराझ अहमद खान या हिंदुस्थानच्या जोडीचे कास्य पदक थोडक्यासाठी हुकले. रीम शरशानी व राशीद हमाद या कतारच्या जोडीने 32-31 अशा फरकाने हिंदुस्थानच्या जोडीवर विजय मिळवला आणि तिसऱया स्थानावर मुसंडी मारली.






























































