
मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचे जगभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. आखाती देशांनी हिंदुस्थानी दूतावासांना एकापाठोपाठ एक समन्स बजावल्यानंतर प्रत्यक्ष कृतीतून निषेध करण्यास सुरुवात केली आहे. कुवेतच्या सुपरमार्केटमधून हिंदुस्थानी उत्पादने हटवण्यात आली आहेत. यावरून भाजपच्या ‘बेतालवाणी’चा हिंदुस्थानला मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा तसेच नवीन कुमार जिंदाल या दोन नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. त्याचे देशात पडसाद उमटल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरून संतापाचा सूर बाहेर आला आहे. आखाती देशांनी रविवारी भाजप नेत्यांच्या विधानांचा कडक शब्दांत निषेध केला आणि त्याबाबत हिंदुस्थानी दूतावासांना जाब विचारला. त्यानंतर आता आखाती देशांच्या मार्केटमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कुवेत शहरातील सुपरमार्केटनी आपल्या शेल्फमधून सर्व हिंदुस्थानी उत्पादने बाहेर काढली आहेत. त्यावर बंदीचे मोठे फलक लावत भाजप नेत्यांच्या वादग्रस्त विधानांचा जाहीर निषेध नोंदवला आहे. तसेच अल-अर्दिया को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्टोअरच्या कर्मचाऱयांनी हिंदुस्थानी चहा व इतर उत्पादनांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. शहराबाहेरील सुपरमार्केटमध्ये हिंदुस्थानी तांदूळ, मसाल्यांसह इतर उत्पादने प्लॅस्टिक शीटमध्ये झाकली गेली आहे. तसेच त्यावर ‘आम्ही हिंदुस्थानी उत्पादने काढून टाकली आहेत’, असे अरबी भाषेत लिहिले आहे.
आखाती देशांची संकुचित मानसिकता!
आखाती देशांनी घेतलेल्या भूमिकेवर हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी नाराजी व्यक्त केली. इस्लामिक देशांच्या संघटनेने केलेल्या टिप्पण्या अनावश्यक आणि संकुचित विचारसरणीच्या आहेत. हिंदुस्थान जगातील सर्व देशांचा आदर करतो. इस्लामिक देशांच्या संघटनेने दिशाभूल करणाऱया प्रतिक्रिया दिल्या आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
भाजपच्या धर्मांधतेने देशाची प्रतिमा डागाळली
भाजप नेत्यांच्या बेताल विधानांवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल भाजपच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे हिंदुस्थानची जागतिक पातळीवर नाचक्की झाली. भाजपच्या लाजिरवाण्या धर्मांधतेने जगापुढे हिंदुस्थानची प्रतिमा खराब केली आहे. हीच धर्मांधता देशाला आतून कमकुवत बनवतेय, असे ट्विट करीत राहुल गांधी यांनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला.



























































