लातूर जिल्ह्यात जागतिक योगदिन उत्साहात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

योग साधनेतून मानसिक कणखरपणा येऊन आरोग्यही उत्तम राहते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी फक्त योगदिनालाच योगासने न करता नियमितपणे योगासने केल्यास आरोग्याच्या सर्व समस्या पासून कायमस्वरुपी सुटकारा मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.

येथील टाऊन हॉल मैदानात जिल्हा प्रशासन जिल्हा क्रीडा कार्यालय, आयुष विभाग पतंजली योग, ब्रम्हकुमारी व आयएमए लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिनाच्या चौथ्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक डॉ.शिवाजी राठोड, महानगरपालिका आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, महापौर सुरेश पवार, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, रामेश्वर रोडगे, तहसिलदार संजय वारकड आदींसह नागरिक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती लहान वा मोठी प्रत्येकांनी आपली शारीरीक तंदुरुस्ती चांगली ठेवण्यासाठी योग करणे गरजेचे आहे. योग केल्याने आपले स्वास्थ्य चांगले राहून आपण आपले काम यशस्वी करुन आनंदी राहू शकतो. या योग दिनाच्या कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रम्हाकुमारी नंदा बहनजी यांनी सर्व उपस्थित योग उपस्थितांना योग साधनेचे महत्त्व पटवून दिले. पतंजलीचे विष्णू भुतडा यांनी सर्व योग साधनेचे प्रशिक्षण दिले. प्रास्ताविक डॉ.रमेश भराटे यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, पतंजलीचे सर्व पदाधिकारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किल्लारीत योगदिन उत्साहात संपन्न

औसा तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय किल्लारी येथे आंतरराष्ट्रीय योगदिवस साजरा करण्यात आला. यावेळी योगगुरु कुंभार, मुख्याध्यापक भोसले, सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना योग कसा करायचा याचे प्रात्याक्षिक करून दाखवले. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. त्याचबरोबर शिक्षक, शिक्षिकांनी सुद्धा याचा लाभ घेतला.

औसा तालुक्यातील ही एकमेव शाळा आहे ज्या ठिकाणी योगाचे धडे नित्यनियमाने दिले जातात. या शाळेतील एकूण २००० विद्यार्थी योग करतात त्यामुळे किल्लारीमध्ये एक तंदुरुस्त पिढी तयार करण्यामध्ये शाळा आणि विद्यार्थ्यांचा मोठा हातभार लागतो.

मंगरुळच्या ज्ञानवर्धिनी विद्यालयात जागतिक योगदिन साजरा
जळकोट – मंगरुळ (ता.जळकोट) येथील ज्ञानवर्धिनी माध्यमिक विद्यालयात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाच्या मैदानावर योगाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांबरोबर गावातील ग्रामस्थांनीही योगाचे प्रात्यक्षिक केले.

योगविषयक मार्गदर्शन योगशिक्षक हणमंत केंद्रे यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक शिवाजीराव भोसले, एम.जे. राठोड, जी.आय. भद्रे, डी.व्ही लांडगे, जी.पी. लंजिले, मनोज केदार, अप्पाराव चंदनशिवे, कासिम पठाण, किशन चंदनशिवे, व्यंकट सूर्यवंशी यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळकोट शहर व तालुक्यातही विविध ठिकाणी योग शिबीर घेण्यात आले. जळकोटच्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक मोहमद रफी पटेल, पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल घोगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत योग प्रात्यक्षिके करण्यात आली. योग प्रशिक्षक व्यंकट कडकंजे, नागेश पंदरगे यांनी प्रात्यक्षिके करुन घेतली. यावेळी पोलीस कर्मचारी, भरतीपूर्व अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा (धामणगाव), जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा (अतनूर ), जि.प.प्रा.शा., फटाकडी तांडा, रावणकोळा, वाघमारी तांडा, विकास विद्यालय अतनूर यासह विविध शाळा, महाविद्यालये व संस्था येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस प्रात्यक्षिकांसह साजरा करण्यात आला.

अहमदपूर येथे योग दिन साजरा
अहमदपूर – येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये अहमदपूर पतंजली योग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न झाला. यावेळी अहमदपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आश्विनी कासनाळे, उपनगराध्यक्षा मिनाक्षी रेड्डी, सुनिता पाटील, भांतांब्रे, डॉ. चेरेकर आदी महिला उपस्थित होत्या.

विद्यावर्धिनी हायस्कूलमध्ये योग दिन साजरा
उदगीर – येथील विद्यावर्धिनी प्राथमिक माध्यमिक व इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक म्हणून प्राथमिक शाळेचे लिपिक चंद्रकांत जाधव यांनी मुलांना मार्गदर्शन केले व प्रात्यक्षिकही करून घेतले. यावेळी तिन्ही शाळेचे मुख्याध्यापक आजणे, घोडके, कणसे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. योग दिन यशस्वी करण्यासाठी क्रीडा शिक्षक राजकुमार नगरे, बी.एम.पाटील, पी.एच.सुतार व सर्व शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश पोशट्टी यांनी तर आभार बी.व्ही.बीरादार यांनी मानले.

म.फुले महाविद्यालयात योग दिन साजरा
अहमदपूर – येथील महात्मा फुले महाविद्यालयात क्रीडा विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योग मार्गदर्शक डॉ. ब्रबुवान मोरे यांनी योगासंदर्भात मार्गदर्शन करून योग, प्राणायाम व आसनाचे प्रात्यक्षिक करून उपस्थित प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण दिले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य वसंत बिरादार यांनी केला. सूत्रसंचालन डॉ.ए.एस. मोरे यांनी तर आभार प्रा.डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.