
जय शंकर भक्त परिवार, मुंबई या आमच्या मित्र परिवाराने गिरनार परिक्रमा आणि सफाई अभियान राबवण्याचे ठरवले. माझी श्रीक्षेत्र गिरनार येथे जाण्याची पहिलीच वेळ होती.
6 नोव्हेंबरला मुंबईहून 37 सेवेकऱ्यांचा आमचा ताफा निघाला 7 नोव्हेंबर रोजी पहाटे जुनागढ रेल्वे स्थानकावर पोहचलो. तिथून पुढे ऑटोरिक्षाने निवासस्थळी पोचलो. आम्ही प्रवेशद्वाराशी असलेल्या प्रथम पायरीला वंदन करून परिक्रमा सुरू केली.
श्री दत्त महाराजांचे नामस्मरण करत सुरू केलेली ही एकूण 38 किमीची पायी चालत असलेली परिक्रमा दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण झाली. तेव्हा आमच्या या यात्रेच्या प्रवासातील एक टप्पा पार पडला.
आता लक्ष होते ते थोडी विश्रांती घेऊन गुरुशिखर चढायला सुरुवात करणे व दर्शन केल्यावर सफाई सेवेला सुरुवात करून दुसरा टप्पाही पूर्ण करायचा. त्याप्रमाणे आम्ही विश्रांती घेऊन झाल्यावर जेवण करून रात्री 11 वाजता गुरुशिखर चढायला सुरुवात केली अन् पहाटे कमंडलू या श्री दत्त महाराजांची धुनी असलेल्या ठिकाणी पोहचलो. तिथे आम्ही धुनीचे दर्शन घेऊन गुरुशिखर चढण्यासाठी मार्गक्रमण केले.
गुरुशिखर येथे श्री दत्त महाराजांचा आजही वास आहे. तिथे चरण पादुकांचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्हा सेवेकऱ्यांचे नेतृत्व करणाऱ्या विश्राम धर्णे, विक्रम धनावडे, सचिन शेलार, पैलास पांगम यांची टिम बनवून कामाची रचना आखली. त्यांच्या नेतृत्वाखाली सफाई सेवा अभियान सुरु केले.
समोर दिसणारा महामेरू चढून जायचे आणि वरपासून सफाई सेवा करत खाली यायचे असे ठरले. हे अभियान राबविण्यात आम्ही मावळेरूपी सेवेकरी हातात झाडू आणि लोखंडी खराटे घेऊन मेरू चढलो.
श्री दत्त महाराजांचा जयघोष करून, त्यांचे नामस्मरण करून कामाला सुरुवात झाली. लाखो भक्तगण या परिक्रमेला येऊन गेले होते. त्यांच्याकडून कळत नकळत कचरा टाकला गेला होता. तो सर्व कचरा आम्ही साफ करण्याचा प्रयत्न केला.
अनेक भक्तगण अभियानात सहभागी झाले. सर्व सेवेकरांनी आपापल्या परीने सुमारे 350 कचऱ्याच्या गोण्या भरल्या. या भक्तगणांच्या रूपाने सहकार्य करणारे आज मी दत्तगुरू पाहिले! वेगळीच अनुभूती घेतली.
>> योगेश साटम, विलेपार्ले



























































