गावठी कट्टे विकण्यासाठी आलेल्या तरुणाला अटक, नगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

गावठी कट्टय़ांच्या विक्रीसाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दोन गावठी कट्टे, सिंगल बोअरची एक गावठी रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

शुभम सुभाष सरोदे (वय 22, रा. गुजाळे, ता. राहुरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलीस नाईक संदीप दरंदले यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर-संभाजीनगर महामार्गावरील सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकजण गावठी कट्टे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पथकाने नगर-संभाजीनगर महामार्गावरील शिंगवेतुकाई परिसरात सापळा रचला होता. मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित तरुण तेथे आल्याचे दिसताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील पिशवीतून दोन गावठी कट्टे, सिंगल बोअरची एक रिव्हॉल्व्हर आणि पाच जिवंत काडतुसे, असा 86 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब काळे, हेडकॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले व भरत बुधवंत या पथकाने ही कारवाई केली.