
कडकनाथ कोंबड्या चोरून नेल्याची माहिती परिसरातील लोकांना दिली. यामुळे संतापलेल्या टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची धक्कायक घटना वारजेतील दत्तनगरमध्ये घडली. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन खैरे, पपुल्या आणि शुभम यांच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदिप नथुराम खैरे (40, बराटे चाळे, दत्तनगर, वारजे माळवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
दोन दिवसांपुर्वी गणेश खैरे, सागर बराटे यांच्यामध्ये भांडणे झाली होती. त्यामुळे संदीपने त्यांना समजावून सांगितले होते. त्याशिवाय संदीप यांच्या कडकनाथ कोंबड्या आरोपी सचिन खैरेने चोरून नेल्याचे दत्तनगर परिसरात सांगितल्याचा गैरसमज आरोपींनी करून घेतला.
त्याच रागातून तिघांनी बिअरच्या बाटलीने संदीपच्या डाव्या कानावर आणि कोयत्याने डाव्या हाताच्या पंजावर, पायाच्या नडगीवर वार करून लाथाबुक्यांनी मारहाण करीत खुनाचा प्रयत्न केला. त्याशिवाय संदीपची पत्नी आणि नातेवाईकांना कोयत्याचा धाक दाखवून शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. जाधव तपास करीत आहेत.




























































