
सामना प्रतिनिधी । श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यात आढळगाव शिवारात डोकेवाडी येथे तांदली दुमाला येथील तान्हाजी भुजंग शिंदे (40) या तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत शिंदे यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून ‘विजय टांगल याने माझा घात केला आहे. त्याला सोडू नका’, असे लिहिले आहे. चिठ्ठीतील मजकूर आणि मनोहर शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजय टांगल विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तान्हाजी हा विजय टांगल याच्यासोबत अनेक वर्षांपासून मजुरीची कामे करत होता. त्यातून त्यांची घट्ट मैत्री झाली होती. मयत तान्हाजी यास विजय याने 20 नोव्हेंबरला पुणे येथे दवाखान्यात नेले होते आणि 21 नोव्हेंबरला रोजी तांदली येथे आणून सोडले होते. परंतु गुरुवारी सकाळी विजय टांगल राहात असलेल्या घराशेजारील शेतात लिंबाच्या झाडाला मयत तान्हाजी याचा मृतदेह लटकलेला निदर्शनास आले.या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
यानंतर श्रीगोंदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना मयत शिंदे यांच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून ‘विजय टांगल याने माझा घात केला आहे. तो मला दोन लाख रुपये मागत असून माझे त्याच्याकडे एक लाख रुपये आहेत. मी मेल्यानंतर त्याला सोडू नका’, असे लिहिल्याचे दिसून आले. या चिठ्ठीवरून पोलिसांनी विजय यास ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.





























































