मालवणात लोखंडी सळीने युवकाला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण 

चौके बाजारपेठेत बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान किरकोळ कारणावरून दोन गटात मारहाण झाली. या मारहाण प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यानुसार पोलिसांनी चौके येथील नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

निखिल नितीन परब याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत शुभम गावडे याने रात्री पावणे अकरा वाजता फोन करून  बाजारपेठेत बोलाविले. तेथे गेल्यावर त्याला का बोलावले असे विचारले असता शुभम याने लोखंडी सळीने पाठीवर मारहाण केली. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या नित्यानंद गावडे, सच्चीदानंद गावडे, रोहन गावडे, साईप्रसाद गावडे यांनी खाली पाडले आणि लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. या तक्रारीनुसार संशयित पाचही जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शुभम गावडे याने आपल्या तक्रारीत माझी दुचाकी काकाने काढून घेतल्याने निखिल हा दररोज चिडवत होता. त्यामुळे याची विचारणा करण्यासाठी त्याला बोलाविले. यावर त्याने तसेच त्याच्यासोबत आलेल्या मंदार संजय गावडे, संजय वासुदेव गावडे, रोहित संजय गावडे यांनी लाकडी रिपने मारहाण केली. त्यानुसार पोलिसांनी या चारही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी सुनील वेंगुर्लेकर करत आहेत.