युवा संघर्ष यात्रा नागपुरात अडवली, रोहित पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेली आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा आज नागपूरमध्ये धडकली आहे. संघर्ष यात्रेच्या सांगता सभेनंतर काही रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा विधान भवनाच्या दिशेने नेण्यात आली. मात्र, विधान भवनावर पोहोचण्यापूर्वी नागपुरात पोलिसांनी ही यात्रा अडवून रोहित पवार यांना ताब्यात घेतलं आहे.

युवा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून युवा आणि राज्यातील सामान्य माणूस यांच्या प्रश्नांसाठी रोहित पवारांनी पुणे-नागपूर असं 800 कि.मी. हून अधिक अंतर चालत पार केले. या यात्रेत ठिकठीकाणी सामान्य नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा यांच्याकडून त्यांचे स्वागत करण्यात आलं. मात्र, त्याची सांगता नागपूर येथे होत असताना कार्यकर्ते आणि पोलिसांत संघर्ष पाहायला मिळाला. पोलिसांनी ही यात्रा अडवून रोहित पवार यांना ताब्यात घेतलं.

ही यात्रा विधान भवनाकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आमदार रोहित पवारांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला. यामुळे काही वेळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं.

या संघर्षात काही कार्यकर्ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे. रोहित पवार यांच्यासह काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे. या सर्व प्रकाराचा निषेध करताना रोहित पवार यांनी एक्स या समाजमाध्यमावर सरकारचा निषेध केला आहे. राज्यभरातील युवांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेची धास्ती घेऊन पळ काढणाऱ्या आणि पोलिसांना पुढं करुन बळाचा वापर करणाऱ्या या गोंधळलेल्या, निकामी आणि पळकुट्या सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध! अशा शब्दांत रोहित पवार यांनी निषेध नोंदवला आहे.