भोलानाथ पावला, पाणी साचल्याने आखाडा बाळापुरच्या जिल्हा परिषद शाळेला सुट्टी

110

सामना प्रतिनिधी, हिंगोली

हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील हनुमान नगर भागातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या परिसरात आणि वर्गखोल्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे आज ९ जुलै रोजी या शाळेला सुट्टी देण्यात आली.

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का ? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ? हे बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे गीत आज आखाडा बाळापुर मध्ये प्रत्यक्षात आले. आखाडा बाळापुरच्या हनुमान नगर भागात जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत प्राथमिक शाळा असून एकूण ५ वर्गखोल्या आहेत. एक खोली कार्यालयासाठी तर अन्य चार मध्ये वर्ग भरवले जातात. शाळेमध्ये एकूण १४३ विद्यार्थी ज्ञानार्जनासाठी येतात. तर मुख्याध्यापकासह पाच शिक्षक कार्यरत आहेत. दरम्यान ८ ते ९ जुलै च्या दरम्यान रात्री झालेल्या पावसामुळे हनुमान नगरच्या शाळेत पावसाच्या पाण्यामुळे तळे साचले. आज सकाळी नेहमीप्रमाणे विद्यार्थी शाळेत आल्यावर वर्गखोल्यांमध्ये देखील पाणी साचल्यामुळे बसावे कुठे असा प्रश्न लहानग्या विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला. दरम्यान शाळेच्या व्हरांड्यात तसेच वर्गखोल्यांमध्ये देखील पाणी साचल्यामुळे आज प्रार्थना देखील होऊ शकली नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

मागील काही वर्षापासून एकदा तरी असा प्रसंग शाळेत येत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.  विद्युत पंप लावून मागच्या दोन वर्षांपूर्वी शिक्षकांनी पाणी काढून दिले होते. मात्र यंदाच्या वर्षी चक्क शाळेला सुट्टी देण्यात आली. याबाबत शाळेचे मुख्याध्यापक सय्यद रफिक यांना विचारणा केली असता वर्गखोल्यांमध्ये पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या