
राहाता बाजार समितीतील कांदा आडतदाराची केरळमधील कोचिकोड येथील एम. व्ही. आर. ट्रेडर्सच्या मालकाने 24 लाख 49 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहाता पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक वेलुस्वामी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून, महेश दत्तात्रय खर्डे (वय 34, रा. कोल्हार) यांनी फिर्याद दिली आहे.
राहाता बाजार समितीतील भगवती ट्रेडर्सचे मालक महेश खर्डे यांनी 1 मे 2012 ते 22 मार्च 2021 या कालावधीत एम. व्ही. आर. ट्रेडर्स कोचिकोड (केरळ)चे मालक अशोक वेलुस्वामी यांना पाठविलेल्या कांद्याचे एकूण 24 लाख 49 हजार 280 रुपये मिळाले नाही. खर्डे यांनी अशोक वेलुस्वामी यांना फोन करून कांद्याचे बाकी असलेले पैसे मागितले असता, त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे खर्डे यांनी फसवणुकीची फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहाता पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष पगारे तपास करीत आहेत.
































































