
सामना प्रतिनिधी। राहुरी
राहुरी शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच राञी 3 घरे फोडून लाखभर रूपयांचा ऐवज लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे राहुरीत चो-या व घरफोड्याचे सञ रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे
सोमवारी मध्यरात्र ते पहाट या वेळेत घरफोडीच्या लागोपाठ 3 घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत बुवाशींदबाबा गल्लीतील जगन्नाथ ठोकळे यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष केले. घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश मिळवत सामान अस्ताव्यस्त केले. यावेळी कपाटातील 10 हजार रूपयांची रोकड व 40 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. आज सकाळी घरमालक ठोकळे राहुरीत आल्यानंतर घरफोडीची घटना उघडकीस आली.
या घरफोडी नंतर चोरट्यांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या डुबीच्या मळ्याकडे वळविला. येथील श्रीकांत गोसावी यांच्या गुरूमाई बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गोसावी हे शिर्डी येथे गेलेले असल्याने घरातील नेमका किती ऐवज चोरी गेला याबद्दल माहिती मिळु शकली नाही. यानंतर जवळच असलेल्या चंद्रकांत धसाळ यांच्या स्वयंपाक घराचे कुलूप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवला. कपाटातील साडेआठ हजार रूपयांची रोकड चोरून नेली.चोरीची घटना घडताना धसाळ कुटूंब हे घराच्या दुस-या मजल्यावर झोपलेले होते.
एकाच राञी तीन घरे फुटल्याची माहिती परिसरात पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली होती. या प्रकरणी खबर मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. चोरीच्या घटनेनंतर घराच्या काही अंतरावर तोडलेली कुलूपे आढळली.
































































