
>>दिलीप जोशी
भाषा अनेक प्रकारची असते. शब्दांची तर असतेच असते, पण खाणाखुणांची, चेहर्यावरच्या भावभावनांची आणि नुसत्या नजरेचीही असते. शब्दांच्या भाषेला ध्वनीची जोड असते. विशिष्ट ध्वनींचे शब्द त्या त्या भाषिकांना कळतात. आपल्याला जी भाषा येत नसेल त्या भाषेतलं संभाषण हे कानावर केवळ वेगळीच ध्वनिकंपनं पडणारं ठरतं. म्हणून तर मातृभाषा आणि नंतर आपण शिकलेल्या काही भाषा वगळता जगातल्या इतर शेकडो भाषा कानी पडल्या तरी आपल्याला समजत नाहीत. ज्यांना बोलताच येत नाही त्यांच्यासाठी आता खाणाखुणांची भाषा (साइन लँग्वेज) उपलब्ध आहे. माणसामाणसांतलं संदेशवहन सोपं करण्यासाठी माणूस सतत प्रयत्नशील असतो, पण पशुपक्ष्यांचं काय? त्यांची ही त्यांच्यापुरती ‘ध्वनी’ची भाषा असतेच. अनेक पक्षी, प्राणी विशिष्ट आवाज काढून परस्परांना साद (सिग्नल) घालत असतात. ‘भाषां’चाही आता खूप अभ्यास झालाय.
हत्ती, घोडा किंवा कुत्र्यासारख्या पाळीव प्राण्याने, माणसाने आपल्या भाषेत सूचना देऊन त्यांच्याकडून कामं करून घेण्याचा इतिहास जुना आहे. माणसाने विशिष्ट ध्वनी केला की, कसं वागावं याची बुद्धी किंवा स्मरणशक्ती या प्राण्याला असते. गोरिलासारखी वानर जमात तर उक्रांतीच्या साखळीतली माणसाच्या जवळची. त्यामुळे वानरांनाही सूचना समजतात हे पूर्वी माकडवाला जे खेळ करायचा त्यातून दिसून यायचं.
मात्र गोरिलासारख्या काहीशा भयप्रद वाटणार्या प्राण्याला माणसाची भाषा शिकवणं आणि ती त्याने शिकणं ही अपूर्व गोष्ट म्हणायला हवी. अशाच एका किंवा एकमेव ‘सुशिक्षित’ गोरिलाचं नुकतंच निधन झालं. या गोरिलाचं नाव होतं कोको! तिचा जन्म ४ जुलै १९७१ रोजी अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोच्या प्राणिसंग्रहालयात झाला. कोकोचं सारं आयुष्य कॅलिफोर्नियातील वुडसाइड येथे गेलं. ४ जुलै हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन. त्या दिवशीच्या फटाक्यांच्या आतषबाजीवरून ‘कोको’ला ‘हनाबिको’ (फायरवर्क्स चाइल्ड) असं जपानी भाषेत म्हटलं जायचं.
‘कोको’ प्रसिद्ध होती ती तिला समजणार्या सांकेतिक भाषेमुळे. ‘अमेरिकन साइन लँग्वेज’मध्ये थोडासा बदल करून ‘कोको’शी संवाद साधण्याचं काम तिची केअर-गिव्हर किंवा दाई फ्रॅन्सिन पॅटर्सन करायची. पॅटर्सन यांनी ‘कोको’ला सांकेतिक भाषेच्या १००० खाणाखुणा शिकवल्या होत्या. या भाषेला गोरिला साइन लँग्वेज असंच नाव त्यांनी ठेवलं. एवढ्या साइन्स (खाणाखुणा) म्हणजे जवळपास हजार शब्दांचा संग्रहच कोकोच्या स्मरणात होता. पॅटर्सन यांनी ‘कोको’ला केवळ ‘साइन’चीच भाषा शिकवली असं नाही, तर आपल्याकडे पाळीव प्राण्यांशी आपण आपल्या भाषेत बोलतो तसं त्या ‘कोको’च्या बालपणापासून तिच्याशी इंग्लिशमध्ये संवाद साधत असत. त्यामुळे कोकोला सुमारे २००० इंग्लिश शब्द समजत होते.
‘कोको’च्या या शिकवणीत आपण लहान मुलाला शिकवतो तसा प्रकार होता. व्याकरणाचं ज्ञान होण्यापूर्वीच लहान मूल मातृभाषा शिकतं त्या धर्तीवर कोकोचं भाषिक ज्ञानवर्धन झालं. ‘कोको’चा बुद्धय़ांक (आयक्यू) ७० ते ९५ दरम्यान होता. त्यामुळे तिला बर्यापैकी बुद्धिमत्ता असल्याचं प्राणितज्ज्ञांचं म्हणणं होतं.
फ्रॅन्सिन पॅटर्सन यांची आणि ‘कोको’ची भेट झाली ती पॅटर्सन यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधामुळे. त्यानंतर ‘कोको’ला एका जिवावरच्या दुखण्याने ग्रासलं. त्या काळात पॅटर्सन यांनी तिची इतकी काळजी घेतली की, कोकोला त्यांचा लळा लागला. त्यामुळे ‘कोको’ला नंतर पॅटर्सन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलं. पॅटर्सन यांचं संशोधन स्टॅनफर्ड विद्यापीठातून पूर्ण होताच कोकोला वुडसाइड कॅलिफोर्निया येथे नेण्यात आलं. त्यामागचं आणखी एक कारण असं होतं की, कोकोने मायकेल या गोरिला जोडीदाराबरोबर राहावं. त्यालाही साइन लँग्वेज शिकवण्यात आली होती, २००० मध्ये मायकेल गेल्यानंतर कोको ड्युमे या गोरिलासमवेत राहिली ती अखेरपर्यंत. गेल्या १९ जूनला तिचं सेहेचाळिसाव्या वर्षी निधन झालं. १२७ किलो वजनाची कोको इतर गोरिलांपेक्षा मोठी दिसायची ती तिच्या ‘लार्जर फ्रेम गोरिला’ गटातल्या आईमुळे.
‘कोको’ने एक मांजर ‘दत्तक’ घेतली होती. ती तिचे लाड कशी करायची किंवा पॅटर्सनशी कशी ‘बोलायची’ याचे व्हिडीओ आता उपलब्ध आहेत. ‘कोको’ला शिकवण्यामागचा हेतू हा होता की, गोरिला जमातीच्या प्राण्याचं आकलन नेमकं कसं आणि किती असतं ते लक्षात यावं. या संशोधनातून गोरिलांच्या मानसिकतेची आणि भावभावनांची भरपूर माहिती संशोधकांना मिळाली. पाळीव प्राणीसुद्धा ज्यांच्याकडे असतात त्यांना जीव लावतात. त्यांचं या जगातून जाणं हे कुणीतरी जवळचं गेल्यासारखं दुःखद असतं. ‘कोको’ १९ जूनला झोपेतच हे जग सोडून गेल्याचं लक्षात आल्यावर तिथल्या सर्वांनाच विलक्षण धक्का बसला, मग पॅटर्सन यांची काय अवस्था झाली असेल! …आणि ती मांजर तर पोरकीच झाली. सजीवांचे असे हे भावबंध …जीवसृष्टीच्या सौहार्दाचे!































































