बोरगाव, नांदगावात बंद घराचे कुलूप तोडून चोरी; 11 लाखांच्या रोख रकमेसह दागिने लंपास

सातारा तालुक्यातील बोरगाव येथील एका बंद घराच्या दरकाजाचे कुलूप तोडून घरातील कपाटातील अकरा लाखांची रोकड, तर नांदगाव (ता. सातारा) येथील घराचा कडीकोयंडा तोडून भरदुपारी साडेपाच तोळय़ाचे सोन्याचे दागिने व पन्नास हजारांची रोकड अज्ञात चोरटय़ांनी लंपास केली. दिकसाढवळ्या घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे बोरगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत दिग्विजय आनंदराव गायकवाड यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, बोरगाव येथे दिग्विजय गायकवाड वास्तक्यास असून ते बांधकाम व्यावसायिक आहेत. सातारा शहरात त्यांची बांधकामाची कामे चालू आहेत. त्यासाठी ते रोज सपत्नीक बोरगाववरून सकाळी साताऱयाला जातात व सायंकाळी परत बोरगाव येथे येतात. त्याप्रमाणे ते साताऱयाला गेले होते. सायंकाळी ते परत आले तेव्हा घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले त्यांना दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाट तोडून लॉकरमधील 10 लाख, देव पूजेसाठीचे 20 हजार, पत्नी विद्या यांच्याकडील 60 हजार व घरखर्चाचे 7 हजार 500 रुपये व 3 हजार रुपये किमतीचे चांदीचे नाणे अशी सुमारे 10 लाख 90 हजार 500 रुपयांची रक्कम व ऐवज अज्ञाताने लांबवला असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.

दुसऱया घटनेत नांदगाव (ता. सातारा) येथील दिलीप साहेबराव देशमुख यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील चार तोळय़ाचा कोल्हापुरी साज, दीड तोळय़ाची ठुशी व चांदीचे काही दागिने व शेतीच्या रासायनिक खतासाठी आणलेली 50 हजारांची रोकड चोरटय़ाने लांबवली. त्यावेळी दिलीप देशमुख घर बंद करून नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. परत आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या दोन्ही घटनांची बोरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करीत आहेत.