
सामना प्रतिनिधी । मुरूम
उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली येथून दिनांक २२ जून पासून बेपत्ता असणाऱ्या अस्मिता गजेंद्र पाटील या मुलीचा मृतदेह गावाजवळील विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवार, २७ जून रोजी सांयकाळी गावाजवळ असलेल्या शेतातील विहिरीत एक पोत्याचे गाठोडे तरंगत असल्याचे आढळून आले होते.
उमरगा तालुक्यातील भुयार चिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावी वर्गात शिकत असलेली अस्मिता गजेंद्र पाटील ही ११ वर्ष वयाची मुलगी दिनांक २२ जून पासून गावातूनच दुपारच्या सुमारास बेपत्ता झाली होती. या घटनेवरून गावात व परिसरात अनेक तर्क वितर्कास उधाण आले होते. या प्रकरणात पोलिसांनी अस्मिताच्या कुटुंबियांसह वडील गजेंद्र पाटील याचे अनैतिक संबंध असलेल्या गावातीलच एका महिलेची ही कसून चौकशी केली. मात्र पाच दिवस उलटूनही मुलीचा शोध लागत नसल्याने प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढतच चालले होते. काल बुधवारी सांयकाळी संजय पाटील यांच्या शेतातील विहिरीत एक पोत्याचे गाठोडे तरंगत असल्याचे आढळून आले होते. या पोत्याच्या गाठोड्यात बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह असण्याची शक्यता वर्तवली जात होती. घटनेची माहिती मिळताच मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख हे आपल्या फौज फाट्यासह घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मात्र अंधार पडल्याने सकाळी विहिरीतून पोत्याचे गाठोडे बाहेर काढण्यात आले.
पोत्याच्या गाठोड्यात तीन दगडांसह बेपत्ता झालेल्या अस्मिता गजेंद्र पाटील या मुलीचे मृतदेह असल्याचे दिसून आले. दगडासह अस्मिताचा मृतदेह आढळून आल्याने खूनच झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यासच यास दुजोरा मिळणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी घुगे यांनी घटनास्थळी भेट देत तपासा बाबत पोलिसांना सूचना दिल्या. दरम्यान मृत अस्मिताचे घातपात झाल्याची शंका बळावली असून मुलीचे वडील गजेंद्र पाटील यांच्याकडे पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

































































