अवघ्या दीड वर्षीय चिमुकलीवर काळाचा घाला, सर्पदंशामुळे झाला मृत्यू

यवतमाळ मारेगाव तालुक्यातील टाकळी (कुंभा) गावात रात्रीच्या वेळेत एका दीड वर्षीय चिमुकलीचा सर्पदंश झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काव्या वैभव खेवले असे त्या चुमुकलीचे नाव होते.

अवघ्या 14 महिन्याची काव्या आपल्या आईच्या कुशीत झोपलेली असताना रात्री 2 च्या सुमारास मण्यार जातीचा सर्प तिच्या अंथरुणात शिरला आणि त्या सापाने काव्याच्या पायाला विषारी दंश केला. वेदना असह्य झाल्याने काव्या रडावयास लागली. आईला जाग आल्याने तिला हा साप दिसला. आरडाओरड करिताच शेजारी जमा झाले त्यांनी हा साप पकडला .

काव्याला लागलीच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले . मात्र तिथे योग्य उपचार न मिळाल्याने तिला पुढील उपचारार्थ चंद्रपूर येथे हलविण्यात आले. आणि यावेळी वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

रुग्णालयात तिच्या प्रकृतीची हेळसांड झाली. काव्याला वेळेवर उपचार मिळाले असते तर तीचे प्राण वाचवता आले असते. काव्याच्या मृत्यूला आरोग्य विभागच जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.