
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजधानी दिल्लीत 1984 मध्ये उसळलेल्या भयंकर शीखविरोधी दंगलप्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेले काँग्रेस नेते सज्जन कुमार हे अखेर न्यायालयाला शरण आले आहेत. याआधी शरण येण्यासाठी सज्जन कुमार यांनी उच्च न्यायालयाकडे 31 डिसेंबर ऐवजी आणखी वेळ मागितला होता. परंतू न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावल्याने त्यांना शरण येण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
1984 anti-Sikh riots case: Convict Sajjan Kumar reaches Delhi’s Karkardooma Court to surrender pic.twitter.com/lJ1JzCDWJ2
— ANI (@ANI) December 31, 2018
1984 मध्ये उसळलेल्या भयंकर शीखविरोधी दंगलप्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तसेच त्यांना पाच लाख रुपये दंडही ठोठवला आहे. तब्बल 34 वर्षांनी दंगलीतील पीडित कुटुंबांना न्याय मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी उमटली होती. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर सज्जन कुमार यांना 31 डिसेंबरपर्यंत शरण येण्यास सांगितले होते.
31 ऑक्टोबरला तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निर्घृन हत्या दोन सुरक्षारक्षकांनी केली होती. त्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी शीखविरोधी दंगल भडकली. दिल्लीत शिखांचे भयंकर हत्याकांड करण्यात आले. त्यातील दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पालम कॉलनीमधील राजनगर येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली. तसेच राजनगरमधील गुरुद्वाराही जाळण्यात आला होता. याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची 2013 मध्ये मुक्तता केली होती. तर अन्य तीन आरोपी बलवान खोखर, कॅप्टन भागमत आणि गिरीधर लाल यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या तिघांची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली. सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.




























































