
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या पाच वर्षांत राज्यात 18 वर्षांवरील तब्बल 21 हजार 652 मुली आणि महिलांचे अपहरण झाले असून त्यापैकी 1 हजार 966 जणींचा शोध लागलेला नाही. ही अत्यंत गंभीर बाब असून बेपत्ता मुलींचा तत्काळ शोध घेण्याचे आदेश सरकारने पोलिसांना दिल्याची माहिती सरकारने आज सभागृहाला दिली. विशेष म्हणजे 18 वर्षांखालील 5 हजार 56 मुलींचेही अपहरण झाले असून त्यापैकी 298 मुलींचा अद्याप शोध लागलेला नाही.
मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांकडून पीडित कुटुंबाला एक किंवा दोन दिवस वाट पाहण्याचा अजब सल्ला पोलिसांकडून दिला जात असल्याचे शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱहे यांनी सभागृहात सांगीतले. सामाजिक परिस्थिती, कौटुंबिक कलह आणि तपास यंत्रणेकडून दुर्लक्ष किंवा दुजाभाव केला जात असल्यामुळे पीडित महिलांना प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागतो. त्यातच अनेकदा न्यायासाठी वाट बघावी लागते. परिणामी, महिलांवर अन्याय आणि अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. यासाठी सर्वप्रथम कुटुंबातील व्यक्तींनीच अशा मुलींना आणि महिलांना मानसिक आधार देण्यासाठी स्थानिक पोलिसांनीही विशेष मोहीम राबवावी अशी सूचनाही डॉ. गोऱहे यांनी केली.

































































