
सातारा येथील सदरबझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात असलेली कबुतरांची ढाबळ अज्ञाताने पेटवून दिली. यामध्ये तब्बल 40 कबुतरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रात्री आठ वाजता घडली.
सदर बझारमधील लक्ष्मी टेकडी परिसरात राजेंद्र जाधव यांची कबुतरांची ढाबळ आहे. या ढाबळमध्ये 40 कबुतरे होती. रात्री आठच्या सुमारास अज्ञाताने कबुतरांच्या ढाबळला आग लावली. त्यामुळे ढाबळमध्ये असलेली 40 कबुतरे जागीच मृत्युमुखी पडली. कबुतरांच्या ढाबळला आग लागल्याचे समजताच, जाधव यांनी तातडीने घटनास्ळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत ढाबळ पूर्णपणे जळून खाक झाली होती. ही आग कोणी लावली, हे अद्यापि समोर आले नसून, घटनास्थळी सातारा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. जाधव यांची कोणासोबत भांडणे अथवा पूर्ववैमनस्य आहे का, याची माहितीही पोलीस घेत आहेत. इतक्या मोठय़ा संख्येने कबुतरांचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. ढाबळ पेटविल्याने 40 कबुतरांसह शेड जळून खाक झाले. या ढाबळमधील कबुतरे पाळण्यासाठी शासनाची रितसर परवानगीही घेण्यात आली होती. याचा परवाना दुसऱया एका मित्राच्या नावावर असल्याचे समजते.
































































