
विक्रोळी पूर्व येथील कन्नमवार नगरमधील म्हाडा काॅलनी परिसरातील इमारतीच्या पुनर्विकासासाठी 43 झाडे तोडण्यात येणार आहेत. तर 22 झाडांची अन्य ठिकाणी लागवड करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावाबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत सादर कराव्या लागणार आहेत. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक सूचनेनुसार हा प्रस्ताव एस विभागातील विक्रोळी (पूर्व), म्हाडा काॅलनी, कन्नमवार नगर येथील पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित आहे. या परिसरात एकूण 304 झाडे असून त्यापैकी 43 झाडे तोडण्याचा आणि 22 झाडांचे स्थलांतर करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाची माहिती पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
























































