कॉन्ट्रॅक्टरचे लाड करून प्रसाद खाणाऱ्यांना आयुष्यभर लक्षात राहील असा प्रसाद देऊ! उद्धव ठाकरे यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉन्ट्रक्टरचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा असे सध्याचे सरकार करतेय. पण प्रत्येकाचे दिवस असतात हे याद राखा. आमचे दिवस पुन्हा येणारच आहेत. त्या वेळी असा काही प्रसाद देऊ की आयुष्यभर लक्षात राहील, असा खणखणीत इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मिंधे सरकारला दिला.

शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिरात आज पार पडली. त्या सभेला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे बोलत होते. 55 वर्षांची होऊनही भारतीय कामगार सेना अजून तरुण आहे, असे प्रशंसोद्गार त्यांनी काढले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘जय जवान… जय किसान…’ याच्या जोडीलाच ‘जय कामगार…’ असा नारा दिला होता, असे ते म्हणाले. शिवसेनेची मुलुखमैदानी तोफ म्हणून ओळख असलेले भारतीय कामगार सेनेचे पहिले अध्यक्ष कमांडर दत्ताजी साळवी यांच्या योगदानाचा उल्लेख यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

‘हिंदुस्थानात 60 टक्केच कामगार संघटित असून बाकीचा असंघटित आहे. प्रत्येक क्षेत्र संघटित व्हायला हवे. फक्त 60 टक्क्यापुरताच हा विषय मर्यादित असेल तर मग असंघटित असलेला शेतकरी हा आपला औद्योगिक चेहरा का होऊ शकत नाही, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी शिवसेनेचा जन्म झाला असून त्या न्याय्य हक्कांसाठी लढताना एकजूट कायम ठेवा, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपस्थित कामगारांना केले.

या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये उद्धव ठाकरे यांची भारतीय कामगार सेनेच्या मुख्य सल्लागारपदी एकमताने निवड करण्यात आली तर अध्यक्ष म्हणून खासदार अरविंद सावंत यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय कामगार सेनेचे कार्याध्यक्ष अजित साळवी, उपाध्यक्ष विनोद घोसाळकर, गुरुनाथ खोत, सरचिटणीस संतोष चाळके व रघुनाथ कुचिक, चिटणीस मनोज जामसुतकर, खजिनदार मनोहर साळवी, संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव व संजय कदम आदी उपस्थित होते.

‘मी मुख्यमंत्री असताना व अरविंद सावंत हे केंद्रात मंत्री असताना आम्ही कामगारांचे काळे कायदे रोखून धरले होते. सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते उद्योगधार्जिणे काळे कायदे संमत करण्यात आले. मात्र तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो. ते काळे कायदे मी राज्यात लागू करू दिले नाहीत. आता केंद्राचे गुलाम असलेले हे सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी कामगारांच्या हिताचाही बळी देत आहे,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. कामगारांना किती प्रकारे छळणार? मशीन वेगळी आणि तीदेखील बिघडते. जितीजागती माणसं, त्यांचा माणूस म्हणून तुम्ही कधी विचार करणार की नाही? की नुसतेच कामगार म्हणून वाट्टेल तसं त्यांना वापरणार? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

कामगारांची वज्रमूठ शिवसेनेची ताकद वाढवत राहील – अरविंद सावंत
शिवसेनेच्या अनेक संघटना विमा, बँका, रेल्वे व अन्य ठिकाणी आहेत. त्या भारतीय कामगार सेनेला संलग्न झाल्या तर भारतीय कामगार सेना महासंघही केंद्रीय कामगार संघटना म्हणून मान्यता मिळवल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास यावेळी शिवसेना नेते व भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत यांनी व्यक्त केला. चारी बाजूंनी हल्ले होत असताना उद्धव ठाकरे नावाचा सह्याद्री हिमालयासारखा उभा आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योग जगवण्याचे आणि कामगारांच्या आयुष्यात भरभराट आणण्याचे काम भारतीय कामगार सेना करतेय याचा मला अभिमान आहे. संघटनेचे कामगार वज्रमूठ करून राज्यभरात शिवसेनेची ताकद वाढवतील, असेही ते म्हणाले.

कॉन्ट्रक्टरच कंत्राटी कामगारांचे नेते बनायला लागलेत – सचिन अहिर
कॉन्ट्रक्टरच कंत्राटी कामगारांचे नेते बनायला लागले आहेत, अशी टीका भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन अहिर यांनी केली. कामगारविरोधी कायदे बनवणाऱ्या आणि कामगारांचे प्रश्न जाणून न घेणाऱ्या सरकारला भारतीय कामगार सेनेचा हिसका दाखवावाच लागेल, असा इशारा त्यांनी दिला. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्याबाबत काय निर्णय घेणार असे कोणतेही धोरण राज्य सरकारकडे नाही. कामगारांच्या शिष्टमंडळाला भेटण्याचेही सौजन्य सरकार दाखवत नाही असा आरोपही त्यांनी केला.