मोलकरणीचा छळ करून तिला ठार मारलं, हिंदुस्थानी वंशाच्या महिलेला सिंगापूरमध्ये 30 वर्षांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरात काम करणाऱ्या मोलकरणीचा अनन्वित छळ करून तिच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या एका 64 वर्षांच्या महिलेला सिंगापूरमध्ये शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही महिला हिंदुस्थानी वंशाची आहे.

या महिलेचं नाव प्रेमा नारायणस्वामी असं आहे. प्रेमा यांच्या मुलीकडे पिआंग नावाची मूळची म्यानमारची असलेली मोलकरीण काम करत होती. प्रेमा यांची मुलगी तिच्यावर अत्याचार करत होती. ते पाहून प्रेमा यांनीही तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. तिला लाथा मारणे, कानाखाली मारणे, उपाशी ठेवणे अशा प्रकारे तिचा छळ केला जात असे. तिचा गळा पकडून तिला फरफटत नेत असल्याचा तसंच तिचा इतर छळ होत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं होतं.

जवळपास 14 महिने तिचा छळ करण्यात आला. 26 जुलै 2016 रोजी तिचा मेंदुला झालेली दुखापत आणि वारंवार होत असलेल्या मारामुळे मृत्यू झाला. मे 2015मध्ये पिआंगने गायत्रीकडे काम करायला सुरुवात केली होती. ती कामाला लागली तेव्हा तिचं वजन 39 किलो होतं आणि मृत्यू झाला तेव्हा तिचं वजन अवघं 24 किलो इतकं होतं.

प्रेमा यांच्या मुलीला गायत्री मुरुगायन हिला या प्रकरणी 2021मध्ये 30 वर्षांची शिक्षा सुनावली. गायत्रीवर 28 गुन्हे सिद्ध झाले होते. या प्रकरणी तिचा छळ करून तिच्या मृत्युला कारणीभूत ठरलेल्या प्रेमा यांनाही न्यायालयाने 30 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली.