कोयनेत 80 टीएमसी पाणीसाठा

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, कोयना धरण क्षेत्रातही चांगला पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही वेगाने वाढत चालला आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास धरणात 79.70 टीएमसी साठा झाला होता. सध्या धरणात 19 हजार क्युसेकने पाणी येत होते. दरम्यान, 24 तासांत नवजाला 116 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

मागील सव्वा महिन्यापासून जिह्याच्या पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱयात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठय़ातही वेगाने वाढ होत आहे. धोम, कण्हेर, उरमोडी, तारळी, बलकवडी आदी प्रमुख धरणांत 70 टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झालेला आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. धरणात शुक्रवारी सकाळी 79.70 टीएमसी पाणीसाठा झाला होता. सध्या धरणात 19 हजार 297 क्युसेक वेगाने पाणी येत होते. धरणात गेल्यावर्षीपेक्षा यंदा अधिक पाणीसाठा झालेला आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

कोरेगाव तालुक्याला पावसाची प्रतीक्षा

कोरेगाव ः तालुक्याच्या उत्तर भागातील एकमेव असलेली वसना नदी मात्र कोरडी पडली आह़े त्यामुळे या भागातील अनेक गावांवर दुष्काळी संकट गडद होताना दिसत आहे. पाऊस नसल्याने वसना नदीवरील सर्व 27 केटी बंधारे सध्या कोरडे पडले आहेत. या नदीवर अवलंबून असलेला नादवळ तलाव कोरडा पडला आहे. त्यामुळे या तलावावर अवलंबून असलेल्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. तर वाठार स्टेशन गावात आजही खासगी टँकरद्वारे गावाला पाणीपुरवठा होत आहे याशिवाय या भागातील वाठार स्टेशन, देऊर तलिये या गावांचा पाणीप्रश्न सोडवणारा तळहिरा तलाव कोरडा पडू लागला आहे. अशीच परिस्थिती अरबवाडी पाझर तलावाबाबत आहे. या सर्व तलावांत मुबलक पाणीसाठा निर्माण होण्यासाठी मोठय़ा पावसाची गरज आहे.