निलंबित नगररचना सहसंचालकाकडे 82 कोटींचे घबाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेले नगर रचना विभागाचे निलंबित सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्याशिवाय त्यांनी सास-याच्या नावाखाली  37 कंपन्या स्थापन केल्या असून त्यात मोठी आर्थिक गुंतवणूक केली आहे.    आतापर्यंतच्या तपासात त्यांची  82 कोटींची बेनामी मालमत्ता उघड झाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हनुमंत नाझीरकर यांना मंगळवारी अटक होती. न्यायालयाने त्यांना 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. याप्रकरणी  हनुमंत नाझीरकर, पत्नी संगिता नाझीरकर, मुलगी गितांजली नाझीरकर, मुलगा भास्कर नाझीरकर (सर्व रा. स्वप्नशिल्प सोसायटी, कोथरुड), अनिल शंकर शिपकुले , बाळासाहेब विठ्ठल घनवट (दोघेही रा. शिरवली,  बारामती), अ‍ॅड़ विजयसिंह भगवान धुमाळ (74, रा. बारामती), राहुल शिवाजी खोमणे (31, रा. शिरवली, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
उत्पन्नापेक्षा अधिक 2 कोटी 85 लाख रुपयांची मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 18 जून 2020 मध्ये नाझीरकरविरूद्ध  अलंकार  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एसीबीने केलेल्या तपासात नाझीरकर यांच्या उत्पनापेक्षा 82कोटी 34 लाख 38 हजार 680 रुपयांची जादा मालमत्ता सासरे गुलाब धावडे, पत्नी संगिता, मुलगी गितांजली व मुलगा भास्कर यांच्या नावाने असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही मालमत्ता एकूण उत्पन्नाच्या1162 टक्के अधिक आहे. नाझीरकर याचे सासरे हे 1987 मध्ये वर्ग 4 चे कर्मचारी म्हणून निवृत्त झाले. त्यावेळी त्यांना पेन्शन ३०० रुपये होते. असे असताना त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्या असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.