
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
विद्यावेतन ६ हजारांवरून १२ हजार रुपये करा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या संपाची सरकारने काहीच दखल घेतली नाही. तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून वाढीव विद्यावेतनासंदर्भात कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने हा संप बेमुदत सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘अस्मी’ संघटनेचे सहसचिव डॉ. किशोर डुकरे यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची संघटना असोसिएशन ऑफ स्टेट मेडिकल इंटर्न (अस्मी) संघटनेद्वारा पाच दिवसांपासून संप पुकारण्यात आलेला आहे. या संपामुळे रुग्णसेवेवर परिणाम झाला आहे. घाटीतील १९० प्रशिक्षणार्थी डॉक्टर संपावर आहेत. शनिवारी नागपूर येथे अस्मी संघटनेचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे अधिकारी उपस्थित होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कोणतेही ठोस आश्वासन न दिल्याने अस्मी संघटनेने तूर्तास संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
या संपासंदर्भात डॉ. डुकरे म्हणाले की, अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्यासोबत आमची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्याचे तोेंडी आश्वासन दिले. मात्र, लेखी आश्वासन न मिळाल्याने आम्ही संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता मंगळवारी अर्थमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळण्याची शक्यता आहे. तसेच वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबतही बैठक होण्याची शक्यता आहे. यानंतर संपाबाबत निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.































































