
सामना प्रतिनिधी । कुडाळ
कुडाळ शहरात जी विकास कामे झाली आहेत ती शिवसेनेच्या माध्यमातून म्हणजेच पालकमंत्री, खासदार व आमदार यांच्या प्रयत्नांतून झाली आहेत. कुडाळच्या मच्छिमार्केटचाही प्रश्न आम्ही नगरसेवकांनी उचलून धरला आणि तो लवकरच मार्गी लागणार आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी यात फुकटचे श्रेय घेऊ नये, असा टोला कुडाळ नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांना लगावत शहरात अनधिकृत बांधकामांना नगर पंचायतीतील सत्ताधाऱ्यांमुळेच ऊत आला असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
कुडाळचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी गेल्या अडीच वर्षांत न.पं.तील सत्ताधारी मंडळींकडून झालेल्या विकास कामांचा आढावा घेत कोट्यावधीची कामे झाल्याचे सांगत शिवसेनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली होती. त्यावर न.पं.तील शिवसेनेचे गटनेते महेंद्र (बाळा) वेंगुर्लेकर, नगरसेवक गणेश भोगटे, सचिन काळप, सौ.मेघा सुकी, सौ.प्रज्ञा राणे व सौ.श्रेया गवंडे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्धारे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेना नगरसेवकांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, कुडाळच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी मच्छीमार्केट प्रश्नाबाबत स्वतःची व सत्ताधारी नगरसेवकांची पाठ थोपटली. परंतु हा मच्छिमार्केटचा प्रश्न आम्ही विरोधी नगरसेवकांनी उचलून धरला व पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी दीलिप पांढरपट्टे यांच्या समक्ष मुख्याधिकारी यांच्याकडे मांडला. जिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव द्या, लगेच मंजूरी देतो तसेच चर्चा करून भूखंड देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागणार आहे. तेव्हा नगराध्यक्षांनी यात फुकटचे श्रेय घेऊ नये. एलईडी बसविणे हे शासनाचे धोरण आहे त्याचे श्रेय कोणी एकटा घेऊ शकत नाही हे नगराध्यक्षांनी लक्षात घ्यावे. कुडाळ नगरपंचायत ही आमदारांच्याच प्रयत्नांतून मंजूर झालेली आहे. पहिला जेई (तात्पुरता) हा आमदार वैभव नाईक यांनीच उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच कायमस्वरूपी जेई लवकरच देण्याचे काम आमदार वैभव नाईक करणार आहेत असे असताना जेईला आम्ही खो घालणार असे नगराध्यक्षांचे म्हणणे हास्यास्पद आहे. शहरात जी विकासकामे झाली आहेत ती कामे आमचे पालकमंत्री ना.दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून झाली आहेत. ही कामे विरोधी पक्षाच्या सहकार्यामुळेच झाली आहेत हे सत्ताधाऱ्यांनी नाकारून चालणार नाही. नियोजनचे अध्यक्ष हे पालकमंत्रीच असतात. भंगसाळ नदीच्या बंधाऱ्याच्या बाजूचा भाग सुशोभिकरण करण्यासाठीचा निधी आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेला आहे. तो निधी त्याच कामासाठी वापरण्यात यावा. तो निधी इतरत्र खर्च करून ती कामे आम्ही केल्याचे फुकटचे श्रेय घेऊ नये. तसेच नुसत्या भिंती रंगवून कुडाळला मानांकन मिळवून देण्यापेक्षा गोधडवाडी, तुपटवाडी, मस्जिद मोहल्ला, नाबरवाडी, नवीन डेपो येथे स्वतः फिरून तेथील कचरा व दुर्ग॔धीकडे पहिले लक्ष द्यावे असा सल्ला शिवसेना नगरसेवकांनी सत्ताधारी मंडळीला दिला आहे.
शहरात उघड्यावर सोडलेले सांडपाणी, उघड्यावर शौचास बसणे त्यामुळे भविष्यात कुडाळ शहर हे रोगमुक्त नव्हे तर रोगयुक्त होणार अशी जनतेची धारणा झालेली आहे. गतवर्षी कुडाळ बाजारपेठेत भोगटे बिल्डिंगला आग लागून मोठी हानी झाली होती. त्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार वैभव नाईक यांनी अग्निशामक बंबासाठी नगरविकासमधून कुडाळ शहरासाठी निधी मंजूर करून आणला आहे. परंतू शासकीय जागेसाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले नाहीत यावरून त्यांना कुडाळच्या जनतेच्या सुरक्षिततेची किती काळजी आहे हे दिसून येते असा टोला शिवसेना नगरसेवकांनी लगावला आहे.

































































