72 हजार बेरोजगारांची मेगाभरती करा; विरोधकांची विधान परिषदेत मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात सरकारी नोकरभरती बंद आहे. 30 टक्के नोकरकपातीमुळे सरकारी आणि निमसरकारी नोकऱया आणि शिक्षक यांची अडीच लाख पदे रिक्त असून बेरोजगारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सरकारने तातडीने शिक्षक भरती आणि 72 हजार बेरोजगारांची मेगाभरती करण्यासंबंधीची जाहिरात काढावी अशी मागणी विरोधकांनी बुधवारी विधान परिषदेत केली.

बेरोजगारीमुळे शिक्षकांची अवस्था अत्यंत बिकट आहे. अनेकांना पगार वेळेवर मिळत नाही. त्यामुळे शिक्षक आंदोलनाला बसले आहेत. सरकारने याबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. जयंत पाटील यांनी शासनाला नेमकी किती कर्मचाऱयांची आवश्यकता आहे, सरकारकडे किती वर्कलोड आहे याबाबतची माहिती देण्याची मागणी केली. विनायक मेटे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना नोकरीत संधी मिळत नसल्याकडे लक्ष वेधले. तर प्रकाश गजभिये यांनी मागास प्रवर्गातल्या जागा भरण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बेरोजगारीच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याची मागणी केली.