
सामना प्रतिनिधी । नगर
शहरात गुंडागिरी, दहशत करणारे आता स्वतःची कातडी वाचवण्यासाठी आव आणू लागले आहेत. केडगाव हत्याकांडात ज्यांची नावे उघड झाली, पोलीस अधिक्षक कार्यालयावर ज्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, त्यांच्यामुळे नगरला फार मोठा कलंक लागला आहे. आपले पाप झाकण्यासाठी भाजपापुढे लोटांगण घालून राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तसेच त्यांच्याच पक्षातील वरिष्ठांना अंधारात ठेवून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी व स्वार्थासाठी स्वतःचा पक्ष दावणीला बांधून ज्यांनी कृत्य केले, त्यांचे खायचे दात व दाखवयाचे दात हे त्यांच्या पक्षाला दिलेल्या खुलाशावरून पुन्हा एकदा सिध्द झालेले आहेत. आर्थिक हितसंबंध या रूपाने पुन्हा पाहायला मिळालेले आहेत. सोयऱ्या-धायऱ्यांचे साटेलोटे पुन्हा एकदा जाहीर उघड झाले आहे. घडलेल्या घटनेपासून स्वत:ला सावरण्यासाठी शिवसेनेला बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून शिवसेना हे कदापिही सहन करणार नाही. अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
नगर शहरात गुंडगिरी व दहशत निर्माण करून सत्तेसाठी सोयरे-धायरे नेहमीच एकत्र आलेले आहेत. आपल्या जावयांना व आपल्याच घरच्यांना पदे पाहिजेत असा अट्टाहास धरून आजही यांनी घरणेशाही कायम ठेवली आहे. अनेक इच्छुकांना सत्तेपासून परावृत्त करण्यासाठी यांनी गुंडगिरीचा वापर केला. याच्या रितसर तक्रारी सुध्दा झालेल्या आहेत. त्यामुळेच शहर भयमुक्त करून येथील जनतेला संरक्षण देण्याचा संकल्प शिवसेनेने गेल्या 25 वर्षापासून आजपर्यंत नेटाने लावून धरला आहे व यामुळेच जनता नेहमी शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. मात्र, काही वर्षात सत्तेसाठी हापापलेल्या सोयऱ्यांनी अनेक घरात भांडणेलावली. पक्षात फूट पाडली. अनेकांना प्रलोभन दिली व पुन्हा दहशत करून जनतेला वेठीस धरण्याचा प्रकार यांनी सातत्याने केला आहे. शिवसेनेने त्यांचे मनसुबे अनेक वेळा उधळून लावले आहेत, असेही राठोड यावेळी म्हणाले.
केडगावच्या पोटनिवडणुकीत मागील सहा महिन्यापूर्वी भाजपाला अवघी 151 मते मिळाली. डिपॉझिट जप्त झाले. तेथे त्यांची नाचक्की झाली. एकही पदाधिकारी फिरकला नाही. उलट त्यांनीच काँग्रेसच्या उमेदवाराला आतून मदत केली. सेटलमेंट केली. तेथे सुध्दा त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी गद्दारी केली. त्या निवडणूकीनंतर दोन शिवसैनिकाची हत्या झाली. त्यामध्ये या सोयऱ्या-धायऱ्यांचा व त्यांच्याच कार्यकर्त्यांचा सहभाग झाल्याचे उघड झाले आहे. त्यांना सुरूवातीला अटकही झाली आहे. राज्यात नव्हे तर देशाला लाजीरवाणी घटना ठरलेल्या पोलीस अधिक्षक कार्यालयावर हल्लाही यांच्याच लोकांनी केला. पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हे सुध्दा दाखल झालेले आहेत. आजही हा खटला चालू आहे. या सोयऱ्यांनी षडयंत्र रचून पुन्हा दहशत, दादागिरी सुरू केली. आता स्वतःचे राजकीय अस्तित्व संपुष्टात येणार असल्याने काही प्रवृत्तींना हाताशी धरून महानगरपालिका निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी अशी छुपी आघाडी त्यांनी केली, असेही ते म्हणाले.
निष्ठावान राष्ट्रवादी कार्यकर्ते यांना वैतागलेत!
एका पक्षात राहण्याची यांची नीती नाही. राजकारणातील नीतीमूल्ये यांनी संपविली. स्वत:च्या पक्षाला, पक्षाध्यक्षांना यांनी फसवले. मी म्हणजेच पक्ष म्हणणाऱ्याना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जुने निष्ठावान कार्यकर्ते वैतागले असल्याचा टोलाही अनिल राठोड यांनी लगावला आहे.




























































