
सामना प्रतिनिधी, सटाणा
बागलाण तालुक्यातील सारदे येथील गावाशेजारी असलेल्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या युवतीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली. नकुशी आहिरे (22) असे मृत तरुणीचे नाव आहे.
सारदे गावातील पाणीटंचाई पाचवीलाच पुजलेली असून गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय टँकरद्वारे गावाची तहान भागवत आहे. अपुऱया पावसाने तालुक्यावर संकट घोंघावत असतानाच तालुक्यातील सारदे येथील गावाशेजारी असलेल्या विहिरीवर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास नकुशी आहिरे ही तरुणी पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिचा पाय घसरला व थेट विहिरीत पडली. मदतीसाठी जवळपास कोणीही नसल्याने तिचा विहिरीतच मृत्यू झाला. गावातील पोलीस पाटील स्वप्नील देवरे यांनी याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यात कळविले. हवालदार दीपक भगत व पंकज खैरनार यांनी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढला.





























































