
कर्नाटकमधील उडुपी येथील हिजाब प्रकरण ताजे असतानाच आता केरळमधील तिरुवनंतपूरम येथेही असाच काहीसा प्रकार घडला आहे. येथे एका मुस्लिम विद्यार्थिनीने स्टुडंट पोलीस कॅडेटसाठी हिजाब आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
इस्लाममध्ये महिला आणि मुलींना हिजाब घालून बाहेर जाणे अनिवार्य आहे. त्यामुळे तिरुवनंतपूरम येथील एका शाळेतील विद्यार्थिनीने स्टुडंट पोलीस कॅडेटसाठी (एसपीसी) हिजाब आणि पूर्ण बाह्यांचे कपडे घालण्याची परवानगी मागितली होती. मात्र उच्च न्यायालयाने तिची ही याचिका फेटाळून लावली असून यामुळे धर्मनिरपेक्षता प्रभावित होईल असे म्हटले आहे. यानंतर विद्यार्थिनीने सरकारकडे याबाबत याचिका दाखल केली. याला राज्य सरकारने उत्तर दिले असून विद्यार्थिनीची ही मागणी फेटाळून लावली आहे.
स्टुडंट पोलीस कॅडेटसाठी (एसपीसी) ही शालेय आधारित मुला-मुलींच्या विकासासाठीची योजना आहे. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा, आदर आणि शिस्त निर्माण होऊन लोकशाही समाजाचे भावी नेते म्हणून विकसित होण्यासाठी प्रशिक्षित करण्याचे कार्य याद्वारे केले जाते. त्यामुळे विद्यार्थिनीच्या या मागणीचा विचारही केला जाऊ शकत नाही, असे सरकारने म्हटले आहे.
विद्यार्थीनीच्या या मागणीवर विचार केला आणि निर्णय घेतल्यास आगामी काळात अन्य दलांबाबतही अशी मागणी होऊ शकते, त्यामुळे धर्मनिरपेक्षता धोक्यात येऊ शकते, असे राज्याच्या गृह विभागाने याचिकेवरील उत्तरादाखल म्हटले आहे. तसेच स्टुडंट पोलीस कॅडेटसाठी अशा धार्मिक प्रतिकांचा वापर करण्यास परवानगी देणे योग्य नसल्याचेही गृह विभागाने म्हटले.
हिजाबमुळे राडा
दरम्यान, कर्नाटकमधील उडुपी येथे काही दिवसांपूर्वी मुस्लिम विद्यार्थिनींनी सरकारी महाविद्यालयामध्ये हिजाब घालून प्रवेश केल्यामुळे राडा झाला होता. याला प्रत्युत्तर म्हणून हिंदू तरुण-तरुणींनी भगवे उपरणे घातले होते. त्यामुळे महाविद्यालयात तणाव निर्माण झाला होता. यावर प्रजासत्ताक दिनी बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री अरागा जनेंद्र यांनी राज्यातील सर्व सकारी कॉलेजसाठी एकच युनिफॉर्म लागू करण्याची तयारी सुरू असल्याचे म्हटले.




























































