
येथील सदर बझारमधील कूपर कॉलनीतील बंद बंगला रात्रीच्या सुमारास फोडून चोरटय़ांनी 47 तोळे सोने आणि 40 हजारांची रोकड असा सुमारे 24 लाखांची चोरी केली. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
कूपर कॉलनीत राहणाऱया राज्य उत्पादन शुल्क विभागातील निवृत्त वरिष्ठ अधिकाऱयांचा मुलगा कामानिमित्त पुणे येथे स्थायिक असल्याने ते सदर बझारमधील बंगल्यात एकटेच राहतात. दोन दिवसांपूर्वी ते त्र्यंबकेश्वरला गेले होते. परत आल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरटय़ांनी दाराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करून बेडरूममधील दोन कपाटे फोडली होती. या कपाटात असणारे सुमारे 47 तोळय़ांचे दागिने आणि 40 हजारांची रोकड चोरून नेल्याचे आढळले. चोरटय़ांनी कपाटातील चांदीचे दागिने त्याच ठिकाणी ठेवले होते.
याबाबतची माहिती मिळताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. तसेच ठसे तज्ञांनादेखील त्याठिकाणी आणण्यात आले होते.






























































