
वाई तालुक्यातील खानापूर येथील युवकाचे अपहरण करून त्याचा खून केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंज पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत गुन्हा घडल्यापासून 36 तासांत रत्नागिरी जिह्यातून दोघांना अटक केली असून, एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.
अभिषेक रमेश जाधव (रा. खानापूर, ता. वाई) असे मृताचे नाव आहे. रहिम रसूल मुलाणी (वय 19), प्रज्वल विजयकुमार जाधव (वय 19, दोघेही रा. खानापूर, ता. वाई) आणि एक विधिसंघर्षग्रस्त बालक अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वाई तालुक्यातील चांदक गावाच्या हद्दीतून 2 फेब्रुवारी रोजी पाचच्या सुमारास तिघांनी अभिषेक जाधव याचे अपहरण केले होते. अभिषेक कामाला असलेल्यांनी त्याचे अपहरण झाल्याबाबतची फिर्याद भुईंज पोलीस ठाण्यात नोंदविली होती. अपहरण झालेल्या मुलाचा, तसेच संशयितांचा भुईंज आणि वाई पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार त्यांच्या हद्दीत शोध घेत असताना शुक्रवारी (3 रोजी) दीड वाजण्याच्या सुमारास शेंदुरजणे (ता. वाई) गावच्या हद्दीत अभिषेक जाधव हा जखमी अवस्थेत सापडला. त्याला उपचारांसाठी वाईतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारांसाठी सातारा येथे पाठविले. सातारा येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अभिषेकचा मृत्यू झाला.
स्थानिक गुन्हे शाखा, तसेच भुईंज पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने गुह्याचा जलद गतीने तपास करताना घटनास्थळाकडे येणारे-जाणारे सर्व रस्ते व संशयितांच्या जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी सर्वप्रथम या गुह्यातील तीन आरोपी निष्पन्न केले. संशयितांच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली असता, संशयित हे पोलादपूरमार्गे कोकणात गेल्याची माहिती प्राप्त झाली. त्याप्रमाणे तपास पथकाने गुन्हा घडलेल्या रात्रीपासून रायगड, तसेच रत्नागिरी जिह्यात संशयितांचा शोध घेतला असता, शुक्रवारी संबंधित संशयित दापोली परिसरात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखा, तसेच भुईंज पोलीस ठाण्याच्या संयुक्त तपास पथकाने दापोली परिसरात संपूर्ण रात्रभर संशयितांचा कसोशीने शोध घेतला. त्यानंतर शनिवारी दुपारी या गुह्यातील दोन संशयित, तसेच एक विधिसंघर्षग्रस्त बालक हे दापोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्दे बीच परिसरात दिसून आल्याने त्यांना पकडण्यात या तपास पथकास यश आले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तपास करीत आहेत.





























































