
2021 मध्ये कफ परेड परिसरात तीन महिन्यांच्या चिमुकलीचे अपहरण करून तिचे लैंगिक शोषण आणि हत्या करणाऱया नराधम तृतीयपंथीयाला विशेष पोक्सो न्यायालयाने मंगळवारी फाशी ठोठावली. मुंबई सत्र न्यायालयाने पोक्सोच्या गुह्यात फाशीची शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. कन्हैया ऊर्फ कन्नु दत्ता चौगुले असे फाशी झालेल्या नराधमाचे नाव आहे.
जुलै 2021 मध्ये कफ परेडच्या खाडीमध्ये तीन महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह पुरलेल्या स्थितीत आढळला. याचदरम्यान चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी दिली. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलिसांनी चिमुकलीच्या पालकांशी वाद झालेल्या कन्हैया चौगुले (28) व त्याचा मित्र सोनू काळे (20) या तृतीयपंथीयांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी चिमुकलीचे अपहरण आणि लैंगिक शोषण करून हत्या केली आणि मृतदेह कफ परेडच्या खाडीमध्ये पुरल्याची कबुली दिली. विशेष पोक्सो न्यायाधीश आदिती कदम यांनी सोनू काळेला निर्दोष मुक्त केले. मात्र मुख्य आरोपी कन्हैयाला पोक्सोच्या विविध कलमांतर्गत दोषी ठरवून जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालयाने कन्हैयाला फाशीची शिक्षा ठोठावतानाच या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास मुभा दिली आहे.
पैसे, नारळ, साडी दिली नाही म्हणून राग काढला!
कन्हैया आणि सोनू हे दोघे लोकवस्तीत फिरत असताना तक्रारदाराच्या घरी गेले. तेथे त्यांनी नवजात चिमुकलीला आशीर्वाद दिला. त्या बदल्यात त्यांनी तक्रारदाराकडे पैसे, नारळ आणि साडी मागितली. मात्र आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने तक्रारदाराने त्यांची मागणी पूर्ण करण्यास नकार दिला. त्यातून झालेल्या वादाचा राग काढत दोघे रात्री तक्रारदाराच्या घरी परतले. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून दोघांनी चिमुकलीला पळवले. कफ परेड पोलिसांनी घटनेचा सखोल तपास केला व आरोपीला फाशी ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.



























































