
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी लोकसभेत 53.47 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या हातात नेहमीप्रमाणे भोपळा पडलेला आहे. या भोपळ्याची भाजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना फार चवदार लागल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसले, अशी खरपूस टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. सोमवारी सकाळी ते दिल्लीत माध्यमांशी संवाद साधत होते.
संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र देशाच्या तिजोरीमध्ये सगळ्यात जास्त भरणा करतो. मुख्यमंत्र्यांनी सांगावे किंवा केंद्रात जे मंत्री आहेत त्यांनी सांगावे महाराष्ट्राला नक्की काय मिळाले? थातूर मातूर गोष्टी दिल्या असतील आणि तुम्ही या अर्थसंकल्पाचे कौतुक करता हे धक्कादायक आहे.
महाराष्ट्राला कमजोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्राचे ओरबाडायचे आणि महाराष्ट्राला द्यायचे नाही. आज दिल्लीची जी ‘शान ए शौकत’ आहे ती मुंबई आणि महाराष्ट्राच्या जोरावर आहे. पण अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काय आहे? बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन याचा आम्हाला काय उपयोग नाही. हे गुजरातसाठी करताय तुम्ही, असेही राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात, मराठाड्यात 2025 मध्ये 2100 शेतकऱ्यांनी आत्महत्या केले. हे निर्मला सीतारामन यांना माहिती नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते त्यांना सांगायला पाहिजे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी काय आहे? हे नेहमीचे आहे. तरीही महाराष्ट्राच्या जनतेला जागरूक करण्याचे काम आम्ही करत राहू, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
मुंबई, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली, एकूण बजेटच्या पाव टक्केही तरतूद नाही

























































