जम्मू-कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचे पोस्टर्स जारी; लष्कराकडून शोधमोहीम तीव्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू-कश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवायांचा वेग वाढवला असून, प्रतिबंधित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा पाकिस्तानी कमांडर सैफुल्ला याच्या अटकेसाठी मोहीम तीव्र केली आहे. पोलिसांनी या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचे पोस्टर्स संपूर्ण जिल्ह्यात लावले असून त्याच्याबद्दल माहिती देणाऱ्यास रोख बक्षीस जाहीर केले आहे.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सैफुल्ला हा सध्या किश्तवाड जिल्ह्यातील चत्रू भागात लपून बसला असून तो तिथून निसटण्याच्या प्रयत्नात आहे, असे बोलले जात आहे. डोडा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (SSP) संदीप मेहता यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी आपली ओळख लपवण्यासाठी महिलांचा वेश किंवा बुरखा परिधान करून पळून जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गणपत पूल, नागरी, देसा आणि ठाठरी यांसारख्या सार्वजनिक ठिकाणी त्याचे फोटो असलेले पोस्टर्स लावण्यात आले आहेत. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवले जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, शनिवारी सकाळी गंडोह भागातील चिली जंगलात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दहशतवाद्यांचा एक गुप्त अड्डा उद्ध्वस्त केला. या ठिकाणी शोधमोहीमेदरम्यान पोलिसांना मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थ, ब्लँकेट्स आणि रोजच्या वापराचे साहित्य सापडले आहे, ज्यामुळे या भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.