
देशभरात दुधामध्ये भेसळ करण्याच्या प्रकारामध्ये वाढ झाली आहे. देशभरात तपासलेल्या दुधाच्या प्रत्येक तीन नमुन्यांपैकी एक गुणवत्ता तपासणीत अयशस्वी ठरला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) कडून आर्थिक वर्ष 2025 मध्ये केलेल्या तपासणीत 38 टक्के नमुने हे भेसळयुक्त आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रोज चहासाठी आणि लहान मुलांना देण्यासाठी ज्या दुधाचा वापर केला जात आहे, त्यात भेसळ असून हे शरीरासाठी घातक आहे. याचाच अर्थ छोटय़ा मुलांच्या शरीरात दररोज काही प्रमाणात पांढरे विष जात आहे. हे सर्व धक्कादायक आहे.
एफएसएसएआयच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2015 ते 2018 या वर्षात भेसळयुक्त दुधाच्या नमुन्यांची संख्या 16.64 टक्क्यांनी वाढली आहे. 2022 मध्ये 798 नमुन्यांपैकी अर्धे दूध हे भेसळयुक्त आढळले. तसेच आठवडाभरापूर्वी ‘ट्रस्टिफाइड’ नावाच्या एका स्वतंत्र चाचणी प्लॅटफॉर्मच्या अहवालात दावा करण्यात आला आहे की, देशातील काही प्रतिष्ठत ब्रँडच्या पॅकेज्ड दुधात कोलिफॉर्म नावाचे हानिकारक जीवाणू निर्धारित मर्यादेपेक्षा 98 पट जास्त आढळले आहेत. या अहवालाने पॅकेज्ड अन्न सुरक्षेवरही चिंता वाढवली आहे. 2025 मध्ये देशातील दूध उत्पादन 24.8 कोटी टनांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. मागील 11 वर्षांत 69.4 टक्के वाढ झाली आहे. 330 दुधाच्या नमुन्यांपैकी 233 नमुन्यांमध्ये एक किंवा अधिक भेसळ आढळली. 193 नमुन्यांमध्ये पाणी, 23.9 टक्के दुधात डिटर्जेंट आणि 9.1 नमुन्यांमध्ये युरियाची भेसळ आढळली आहे.
पॅकिंग, एक्सपायरी डेट तपासा
दूध खरेदी करताना नेहमी दुधाच्या पिशवीच्या पॅकिंगची तपासणी करा. तसेच एक्सपायरी डेट तपासल्यानंतर दूध खरेदी करा. दूध स्वच्छ भांडय़ात चांगले उकळा. दूध गरम केल्याने बहुतेक हानिकारक जीवाणू नष्ट होतात. दूध उकळल्यानंतर व्यवस्थित झाकून ठेवा किंवा फ्रीजमध्ये ठेवा. दुधाला वास येत असल्यास किंवा दुधाची चव खराब लागत असल्यास ते दूध फेकून द्या. छोटय़ा मुलांना देऊ नका. यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.
330 दुधाच्या नमुन्यांपैकी 233 नमुन्यांमध्ये एक किंवा अधिक भेसळ आढळली. 193 नमुन्यांमध्ये पाणी, 23.9 टक्के दुधात डिटर्जेंट आणि 9.1 नमुन्यांमध्ये युरियाची भेसळ आढळली आहे.





























































