
आजच्या काळात जवळपास प्रत्येक जण ऑनलाइन असो वा ऑफलाइन, बँकिंग सेवेचा वापर करतो. पैसे ट्रान्सफर करायचे असो वा चेक क्लिअर करणे किंवा एटीएममधून पैसे काढणे असो… बँकिंग व्यवस्था आपल्या आयुष्यात महत्त्वाचा भाग बनली आहे, पण आपण कधी विचार करतो का, की दरवर्षी फक्त ‘चार्ज’च्या नावाखाली आपल्या खात्यातून किती पैसे कापले जातात? प्रत्येक बँक विविध छोटे शुल्क आकारतात, ज्यामुळे खिशावर मोठा परिणाम होतो.
किमान शिल्लक
देशात बँकिंग सिस्टम मजबूत झाली आहे, पण त्याच्या खर्चाचा भार ग्राहकांकडून वसूल केला जातोय. एका सामान्य खातेदाराला बँकेत पैसे ठेवणे पहिल्यासारखे सोपे राहिलेले नाही. जर तुमच्या बचत खात्यात किमान रक्कम नसेल तर तुम्हाला दंड बसू शकतो.
एटीएममधून वारंवार पैसे काढणे
प्रत्येक बँक महिन्यातून एटीएममधून 5 वेळा मोफत (महानगरांत 3 वेळा) पैसे काढण्याची परवानगी मिळते. त्यानंतर प्रत्येक ट्रान्सक्शनसाठी शुल्क आकारले जाते. 1 मे 2025 पासून हे शुल्क 21 रुपयांवरून 23 रुपये केले आहे. त्यावर कर आकारणी होते.
एसएमएस अलर्टच्या नावाखाली कपात
तुमच्या खात्यात व्यवहार झाल्यावर तुम्हाला येणारा एसएमएसदेखील मोफत नसतो. बँक प्रत्येक तिमाही किंवा दर महिन्यांनी एसएमएस अलर्टच्या नावाखाली 15 ते 25 रुपये शुल्क आकारते.
डेबिट कार्ड शुल्क
इतकेच नाही तर डेबिट कार्डसाठी वार्षिक देखभाल शुल्क म्हणून 100 ते 500 रुपये आकारले जातात. याशिवाय तुमचे डेबिट कार्ड हरवले किंवा डॅमेज झाले तर बँक तुमच्याकडून रिप्लेसमेंट कार्डसाठी 50 ते 500 रुपये आकारू शकते. लक्षात घ्या की, ही रक्कम प्रत्येक बँकेवर वेगवेगळी असू शकते.
चेकबुक शुल्क
बँका सामान्यतः पहिले काही चेकबुक मोफत देतात, पण त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त चेकबुकसाठी शुल्क असते. तसेच तुम्ही एक लाख रुपयापेक्षा जास्त किमतीचा चेक क्लिअर केला तर तुम्हाला 150 रुपयांपर्यंत क्लिअरन्स शुल्कदेखील भरावे लागेल.
आयएमपीएस ट्रान्सफर शुल्क
बहुतेक बँका आज एनईएफटी आणि आरटीजीएस ट्रान्सफरसाठी कोणतेही शुल्क आकारत नाहीत, तरीही आयएमपीएस म्हणजे इन्स्टंट मनी ट्रान्सफरवर शुल्क आकारले जाते. 1 ते 25 रुपयांपर्यंत बँक बँकेच्या खातेदारांकडून आयएमपीएस शुल्क आकारू शकते आणि वारंवार ट्रान्सफरसाठी हे शुल्क चांगलेच महाग पडू शकते.






























































