
मातृत्वाला काळिमा फासणारी संतापजनक घटना भिवंडीच्या पडघा परिसरात उघडकीस आली आहे. दत्तक घेतलेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीने शेजारी राहणाऱ्या महिलेला मम्मी म्हणून हाक मारल्याने राग अनावर झालेल्या निर्दयी सावत्र आईने तिच्या डोळ्यांत व तोंडात चक्क मसालाच भरला. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संताप व्यक्त होत आहे. दिलशान शेख असे या निर्दयी मातेचे नाव आहे. दिलशानसह पडघा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भिवंडीच्या पडघाजवळील बापगाव परिसरात राहणाऱ्या दिलशान हिला मूल होत नसल्याने तिने वर्षभरापूर्वी एक मुलगी दत्तक घेतली होती. मात्र तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकलीने शेजारी राहणाऱ्या महिलेला मम्मी म्हणून हाक मारली. हे ऐकताच दिलशानचा पारा चढला आणि तिने रागाच्या भरात या दत्तक मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. ती इतक्यावरच न थांबता चिमुकलीच्या डोळ्यांत आणि तोंडात थेट मसालाच भरला व एका खोलीत डांबून ठेवले. हे क्रूर कृत्य तिच्या पतीने मोबाईलमध्ये कैद केले. हा धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पडघा पोलिसांनी दिलशान शेख, तिचा पती शौकत शेख व मुलीला दत्तक देणाऱ्या उमेश येवाल या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
चिमुकलीची सुखरूप सुटका
हृदय पिळवटून टाकणाऱ्या व्हिडीओ समोर आल्यानंतर पडघा पोलिसांनी तत्काळ विकृत मातेचा शोध घेत तिच्या तावडीतून चिमुकलीची सुखरूप सुटका केली. सध्या या चिमुकलीची प्रकृती स्थिर आहे. तिच्या पुढील संगोपनासाठी तिला बाल निरीक्षकगृहात ठेवल्याची माहिती पडघा पोलिसांनी दिली.





















































