अमृता खानविलकरचं फॅन्सला दिलं खास सरप्राईज; जागतिक महिलादिनी नव्या क्षेत्रात पदार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हिने चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्यानंतर आता अमृताने उद्योजिका म्हणून आपल्या आयुष्यातील एका नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. अमृताने ‘अमूल्य’ नावाचा स्वतःचा साडी ब्रँड लाँच केला असून, या माध्यमातून तिने फॅशन आणि व्यवसायाच्या जगात पाऊल ठेवले आहे.

लहानपणापासूनच साड्यांबद्दल असलेले आकर्षण आणि त्यातील पारंपारिक सौंदर्य जपण्याच्या ओढीतून अमृताने हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. साडी म्हणजे केवळ नेसण्याचे वस्त्र नसून ती एक भावना, आठवण आणि हिंदुस्थानी स्त्रीची ओळख असल्याचे अमृता यावेळी म्हणाली. महिलांना साडीमध्ये मिळणारी ग्रेस आणि त्यांचा आत्मविश्वास पाहत आपण लहानाचे मोठे झालो, त्यामुळेच स्वतःचा काहीतरी वेगळा आणि अर्थपूर्ण ब्रँड असावा या इच्छेतून ‘अमूल्य’चा जन्म झाला आहे. हा ब्रँड म्हणजे माझे बाळ आहे, अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या असून चाहत्यांनी या नव्या प्रवासातही पाठिंबा द्यावा, असे आवाहन तिने एका खास व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)

‘अमूल्य’ हा ब्रँड केवळ फॅशनपुरता मर्यादित नसून तो लावण्य, परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांचा मिलाफ असल्याचे अमृताने आवर्जून नमूद केले. नावाप्रमाणेच अनमोल असणाऱ्या या साड्यांमधून हिंदुस्थानी संस्कृतीचा वारसा पुढे नेण्याचा तिचा मानस आहे. अमृताच्या या नवीन व्यवसायामुळे तिचे चाहते कमालीचे उत्साही असून, सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.