भोंदू खरातप्रकरणी नाशिक, पुणे, शिर्डी, सिन्नरमध्ये ईडीची धाड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोंदूगिरीतून अशोक खरातने जमविलेली संपत्ती आणि केलेले आर्थिक व्यवहार याची ईडीकडून चौकशी सुरू झाली आहे. सोमवारी पहाटेपासून ईडीच्या वेगवेगळ्या पथकांनी नाशिक, सिन्नर, शिर्डी आणि पुण्यात एकाचवेळी धाडी टाकल्या. या कारवाईने सर्व संबंधितांचे धाबे दणाणले आहे.

भोंदू अशोक खरात याने नामी-बेनामी संपत्ती व बेकायदा आर्थिक व्यवहारातून दोन हजार कोटींची माया जमविल्याचा अंदाज तपासी पथकाला आहे. ईडीनेही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे. सोमवारी सकाळी सहापासून नाशिकच्या कर्मयोगीनगर येथील तृप्ताबाला बंगला, पॅनडा कॉर्नर येथील कार्यालय, सिन्नरच्या मिरगाव येथील ब्रह्मानंद फार्म हाऊस येथे वेगवेगळ्या पथकांकडून दिवसभर सर्च ऑपरेशन सुरू होते. सिन्नर व शिर्डीतील राहाता येथील पतसंस्थांमधील खरातच्या कोटय़वधींच्या संशयास्पद व्यवहारांची, बनावट खात्यांची चौकशी करण्यात येत आहे. नाशिक, शिर्डीतील मालमत्तांची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. पुण्यात खरातने मुलीच्या नावावर घेतलेल्या फ्लॅट, इतर संपत्ती व अन्य आर्थिक व्यवहारांची या पथकांनी तपासणी केली आहे. यामुळे त्याच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्वांचे धाबे दणाणले आहे.

प्रतिभा चाकणकरांची पोलिसांकडून चौकशी

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर कुटुंबीयांची शिर्डीतील राहाता येथील समता पतसंस्थेत चार खाती आहेत, त्याच्या नॉमिनी खरात आहे. या खात्यांवर दोन कोटी चाळीस लाखांचे व्यवहार झाले आहेत. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात प्रतिभा चाकणकर, त्यांचे चिरंजीव तन्मय यांची आठ तास चौकशी करण्यात आली.

चौथ्या गुह्यात आज हजर करणार

अशोक खरात याला सोमवारी न्यायालयाने 20 एप्रिलपर्यंतची न्यायालयीन कोठडी दिली. चौथ्या गुह्यात पोलीस कोठडीची मागणी एसआयटीने केली. तुरुंगात पाठवून वैद्यकीय तपासणीनंतर त्याचा ताबा घेण्याची सूचना न्यायालयाने केली. मंगळवारी त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.