
इस्लामाबादमधील शांतता चर्चा फिस्कटल्यानंतर अमेरिकेने इराणची कोंडी करण्यास सुरुवात केली असून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नाकेबंदी केली आहे. इराणला रोखण्यासाठी अमेरिकेने आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. अमेरिकेने या भागामध्ये 15 हून अधिक अत्याधुनिक युद्धनौका तैनात केल्या आहेत. याच मोहिमेचा भाग म्हणून यूएसएस त्रिपोरी ही युद्धनौका अरबी समुद्रात F-35B लाइटनिंग II स्टील्थ फायटर जेट्स, MV-22 ऑस्प्रे विमाने आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टरसह सज्ज ठेवण्यात आलेली आहे. यूएस सेंट्रल कमांडने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये करण्यात आलेली नाकेबंदी अत्यंत कडकपणे लागू करण्यात येत आहे. अरबी समुद्र आणि ओमानच्या आखातासह इराणच्या बंदरांकडे येणाऱ्या किंवा तेथून जाणाऱ्या सर्व जहाजांवर कोणताही भेदभाव न करता कारवाई केली जाईल, असे अमेरिकेने म्हटले आहे. इराण सोडून इतर देशांच्या बंदरांकडे जाणाऱ्या जहाजांना ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’तून जाण्यास अडवले जाणार नाही, असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेची खास युद्धनौका यूएसएस त्रिपोली (LHA-7) या मोहिमेचे नेतृत्व करत असून अरबी समुद्रात रात्रीच्या वेळी उड्डाण मोहीम राबवत आहे. ही युद्धनौका विशेषतः लढाऊ विमानांच्या संचालनासाठी डिझाइन केलेले आहे. या नाकेबंदीसाठी F-35B लाइटनिंग II स्टील्थ फायटर जेट्स, MV-22 ऑस्प्रे विमाने आणि प्रगत हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. एकट्या यूएसएस ट्रिपोलीवरून 20 पेक्षा जास्त F-35B जेट्स एकाच वेळी ऑपरेट केले जाऊ शकतात, अशी माहिती यूएस सेंट्रल कमांडने दिली.
USS Tripoli (LHA 7) conducts night flight operations while sailing in the Arabian Sea. Tripoli is designed without a traditional well deck, which allows for more F-35B Lightning II stealth fighters, MV-22 Ospreys, helicopters, and extra maintenance space. During peak operations,… pic.twitter.com/zjQO1nOcmK
— U.S. Central Command (@CENTCOM) April 13, 2026
दरम्यान, इराणने नाकेबंदी तोडण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. नाकेबंदीजवळ येणाऱ्या इराणच्या कोणत्याही फास्ट अटॅक नौका नष्ट केल्या जातील, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या या इशाऱ्यानंतर इराणनेही जशास तसे उत्तर देण्याची धमकी दिली आहे.
पर्शियन आखात आणि ओमानच्या समुद्रामध्ये सुरक्षा असेल तर ती सर्वांसाठी असेल अन्यथा कोणासाठीही नसेल. या क्षेत्रातील एकही बंदर सुरक्षित राहणार नाही, असे म्हणत इराणच्या सैन्याने ओमानच्या आखातातील सर्व व्यापारी मार्गांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
होर्मुझच्या नाकेबंदीनंतर इराण वठणीवर; करारासाठी पुन्हा संपर्क साधला, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

























































