
तामिळनाडूमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून 234 जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स 200 हून अधिक जागा जिंकून सत्तेत येईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केला आहे. ते ‘पीटीआय‘शी बोलत होते.
आगामी निवडणुकीमध्ये राज्य सरकारने महिलांसाठी राबवलेल्या योजनांचाही उल्लेख स्टॅलिन यांनी केला. राज्य सरकारने गृहिणींसाठी राबवलेली 8000 रुपयांची कूपन योजना निवडणुकीत गेमचेंजर ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच सध्या सुरू असलेली 1000 रुपयांच्या महिला हक्क योजनेची हप्ता पुढील काळात दुप्पट करण्याची घोषणाही त्यांनी केली. तामिळनाडू महिलांसाठी देशातील पहिल्या क्रमांकाचे सुरक्षित राज्य असल्याचा दावाही त्यांनी केला.
बेकायदेशीर वाळू उपसा घोटाळा आणि मद्य घोटाळ्यावरून ईडीने केलेले आरोपही स्टॅलिन यांनी फेटाळून लावले आहेत. हे सर्व केंद्र सरकारने लिहिलेले आणि ईडीने सादर केलेले नाटक आहे. तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या बटीक बनल्या आहेत, अशी टीका यावेळी स्टॅलिन यांनी केली.
अण्ण द्रमुकवर टीका
विरोधी पक्षनेते पलानीस्वामी यांच्या टीकेचाही स्टॅलिन यांनी समाचार घेतला. तामिळनाडूच्या हक्कांचा बळी देणारे नेते गुलाम आहेत, अशी बोचरी टीका स्टॅलिन यांनी पलानीस्वामी यांच्यावर केली. तसेच घराणेशाहीच्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महिला आरक्षण हे भाजपचे राजकीय शस्त्र!
केंद्र सरकारला महिला आरक्षणाची खरोखर काळजी असती तर त्यांनी त्याची त्वरित अंमलबजावणी केली असती. मात्र, भाजप हे आरक्षण विरोधी पक्षांविरुद्ध शस्त्र म्हणून वापरत आहे. जनगणनेनंतर होणाऱ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा अडथळा आणून हे आरक्षण लांबणीवर टाकले जात आहे. ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात चांगली कामगिरी केली आहे. त्यांना या पुनर्रचनेत शिक्षा मिळता कामा नये, असेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.























































