टी-20 विश्वचषकातील कामगिरीचं फळ! संजू सॅमसनला ‘ICC Men’s Player of The Month’ पुरस्कार जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

T-20 World Cup 2026 मध्ये बाद फेरीच्या सामन्यांमध्ये आपल्या बॅटने विरोधी संघांच्या बत्त्या गुल करणाऱ्या संजू सॅमसनला मार्च महिन्यासाठी ICC Men’s Player of The Month पुरस्कार जाहीर झाला आहे. टीम इंडियाने मायदेशात खेळताना विश्वचषकावर नाव कोरले असून, या ऐतिहासिक विजयामध्ये संजू सॅमसनची कामगिरी निर्णायक ठरली होती. त्याच्या तडाकेबंद फलंदाजीमुळे टीम इंडियाने बाद फेरीत वर्चस्व गाजवलं.

संजू सॅमसनचा या स्पर्धेतील प्रवास एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखा राहिला. स्पर्धेच्या सुरुवातीला तो बेंचवर बसून होता, मात्र झिम्बाब्वेविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात संधी मिळताच त्याने संधीचे सोने केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या ‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात नाबाद 97 धावांची खेळी करून त्याने हिंदुस्थानला सावरले. त्यानंतर उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध 89 आणि अंतिम फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पुन्हा 89 धावांची जबरदस्त खेळी करून त्याने हिंदुस्थानला सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

IPL 2026 – विदर्भाच्या पोट्ट्याचा ड्रीम डेब्यू; एकाच षटकात 3 फलंदाजांना शून्यावर बाद करणारा मराठमोळा प्रफुल हिंगे कोण आहे?

या यशाबद्दल बोलताना 31 वर्षीय सॅमसन भावूक झाला. तो म्हणाला की, “हा पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी अविस्मरणीय भावना आहे. हिंदुस्थानच्या विजयात खारीचा वाटा उचलणे हे माझे स्वप्न होते, जे आज पूर्ण झाले आहे.” त्याच्या या पुनरागमनामुळे आणि सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ म्हणूनही गौरवण्यात आले.