
किमान वेतनामध्ये वाढ व्हावी यासाठी नोएडातील कामगारांनी केलेल्या आंदोलनप्रकरणी 300 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने या आंदोलनात झालेल्या हिंसाचाराचा थेट पाकिस्तानशी संबंध जोडला आहे. आंदोलनात सहभागी झालेल्यांचा पाकिस्तानशी संबंध होता का, याची चौकशी केली जात असल्याचे सरकारने आज सांगितले.
वेतनवाढ व इतर मागण्यांसाठी नोएडातील होजियरी कॉम्प्लेक्समधील कामगारांचे आंदोलन गेल्या तीन दिवसांपासून सुरू होते. सुमारे 40 हजार कामगार या आंदोलनात उतरले होते. या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागले.
याप्रकरणी 300 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे, तर शंभरहून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणखी काही लोकांची ओळख पटवली जात आहे, असे पोलिसांनी सांगितले. आंदोलनाशी संबंध नसलेल्या लोकांनी हिंसाचार घडवून आणल्याचा पोलिसांचा संशय आहे.
सुनियोजित कट असल्याचा मंत्र्याचा दावा
नोएडातील हिंसक आंदोलनात पाकिस्तानचा हात असल्याचा संशय उत्तर प्रदेशचे कामगार मंत्री अनिल राजभर यांनी व्यक्त केला. ‘राज्यातील विकासात बाधा आणण्यासाठी व कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी हा जाणीवपूर्वक आखलेला कट असावा, असे ते म्हणाले.’ ‘मागच्या काही दिवसांत नोएडा आणि मेरठ येथून चार संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तपास यंत्रणा या सगळय़ा प्रकरणाची चौकशी करत आहेत,’ असे राजभर म्हणाले.
वेतनात 21 टक्के वाढ
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने आज अकुशल, अर्धकुशल आणि कुशल कामगारांच्या किमान वेतनात 21 टक्के अंतरिम वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून पूर्वलक्षी प्रभावाने होणार आहे.
हे सरकारचे अपयश – अखिलेश यादव
नोएडातील आंदोलन हे सरकारचे अपयश आहे. सरकारच्या उद्योजकधार्जिण्या एकतर्फी धोरणाचा हा परिणाम आहे, असा आरोप समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला.

























































