
अर्जुन बापर्डेकर, आचरा
बदलत्या वातावरणामुळे पिके धोक्यात येत असल्याने संकटात सापडलेल्या शेतकरी मच्छीमारांसाठी शैवाल शेतीच्या माध्यमातून नवा आर्थिक मार्ग सापडला आहे. एका हेक्टरवर केलेल्या या शेतीमधून महिन्यात अडीच लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. देवगडच्या तांबळडेग येथे केलेला प्रकल्प यशस्वी ठरल्यामुळे आता अडचणीत सापडलेल्या सर्वच शेतकरी मच्छीमारांना फायदा होणार आहे.
प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना शेतकरी मच्छीमारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्था भावनगरचे डायरेक्टर अरूप घोष यांनी तांबळडेग येथील प्रकल्पस्थळी भेट देऊन समाधान व्यक्त केले. या प्रकल्पासाठी हेक्टरी सुमारे दीड लाख खर्च होत असून त्यापासून साधारण चार टन उत्पादन मिळून अडीच ते तीन लाखांचे उत्पादन मिळत असल्याचे केंद्रीय मीठ आणि सागरी रसायने संशोधन संस्थेच्या प्रधान वैज्ञानिक मोनिका कवळे यांनी सांगितले. शैवाल शेतीचा प्रयोग सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गजबादेवी, मुणगे, हिंदळे, तांबळडेग येथे प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
असा आहे प्रकल्प
तांबळडेग येथे मच्छीमार बांधवांनी समुद्रात आठ ते दहा वावमध्ये खाऱ्या पाण्यात साधारण दीड ते दोन हेक्टर क्षेत्रावर ट्यूबनेट मेथरने शैवाल शेती करण्यात आली आहे.
डिसेंबरपासून याला सुरुवात करण्यात आली आहे. आता उत्पादन विक्रीयोग्य झाले आहे. एक हेक्टरमध्ये 10 मीटरच्या शंभर ट्यूब बांधण्यात आल्या आहेत.
असा आहे फायदा…
शैवालापासून केरीटीन आणि आगार अशी दोन केमिकल्स मिळतात. तसेच याचा वापर खाद्य, औषधे, सौंदर्य, झाडांना लिक्विड टॉनिक, फार्मास्यूटिकल इंडस्ट्रीजमध्ये केला जात आहे.
या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. माशांना ते खाद्य म्हणून खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे माशांची पैदासही वाढते आणि मच्छीमारांचा व्यावसायिक फायदा होतो.



























































